पानसरे हत्येप्रकरणी सांगलीत सनातनच्या कार्यकर्त्याला अटक, ७ दिवसांची पोलिस कोठडी

By admin | Published: September 16, 2015 12:34 PM2015-09-16T12:34:49+5:302015-09-16T14:30:36+5:30

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली शहर परिसरातून एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Sanatan's activist arrested in connection with Pansare murder, 7-day police custody | पानसरे हत्येप्रकरणी सांगलीत सनातनच्या कार्यकर्त्याला अटक, ७ दिवसांची पोलिस कोठडी

पानसरे हत्येप्रकरणी सांगलीत सनातनच्या कार्यकर्त्याला अटक, ७ दिवसांची पोलिस कोठडी

Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली शहर परिसरातून एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूर व सांगली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून समीर गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे. समीर गायकवाड १९९८ पासून सनातन संस्थेशी संबंधित असल्याचे कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक संजयकुमार यांनी सांगितले. गायकवाडचे संपूर्ण कुटुंबच सनातन संस्थेशी संबंधित असल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलीसांनी समीरला कोल्हापूर येथील कोर्टात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पानसरे हत्येमागे मोठा कट होता का, हत्येची सुपारी दिली होती का, असेल तर ती कोणी दिली अशा अनेक बाबींचा छडा या अटकेतून लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तांत्रिक सर्वेक्षणातून संशयाची सुई समीरकडे वळल्याचे आणि त्यामुळे काल रात्र ८ वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि आज पहाटे पाच वाजता त्याला अटक केल्याचे कुमार यांनी सांगितले.
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व कर्नाटकातील प्रा. कलबुर्गी या पुरोगामी व सुधारणावादी विचारवंतांच्या हत्यांनी देशात खळबळ उडवली होती आणि दोन दोन वर्षे मारेकरी सापडत नसल्याने पोलीस व राज्य सरकार हतबल झाल्याचे दिसत होते. इंद्राणी मुखर्जी प्रकरणी खुद्द पोलीस आयुक्त तपास करताना दिसत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानसरे, दाभोलकर यांच्या हत्येत प्रगती का होत नाही असा सवाल केला होता. त्यानंतर मारिया यांची बढती देऊन बदली करण्यात आली.
फेब्रुवारीमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूरमध्ये राहत्या घराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर  गोविंद पानसरे यांचीदेखील हत्या झाल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत होता. पानसरे यांच्या हत्येला सात महिन्यांचा काळ उलटल्यावरही पोलिस आरोपींना शोधण्यात अपयशी ठरत असल्याने पोलिसांवरही टीकेची झोड उठली होती. कोल्हापूर, सांगली, पुणे आणि कर्नाटक पोलिस या गुन्ह्याच्या तपास करत होते. बुधवारी कोल्हापूर व सांगली पोलिसांच्या संयुक्त पथकाने शहर परिसरातून समीरला अटक केली. त्याचा मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय असून १९९८ सालापासून तो सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करतो. आज दुपारी समीरला बावडा कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. जवळपास दोन कोटी फोन कॉल्स तपासल्यानंतर पोलिसांनी गायकवाडला ताब्यात घेतले. पानसरे यांच्या हत्येचा तपास करताना धागेदोरे मिळाले तरच दाभोलकर हत्येशी यांचा संबंध आहे का हे स्पष्ट होईल असे संजयकुमार म्हणाले.

Web Title: Sanatan's activist arrested in connection with Pansare murder, 7-day police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.