‘सनातन’च्या आठवले यांची चौकशी

By admin | Published: March 2, 2017 01:03 AM2017-03-02T01:03:52+5:302017-03-02T01:03:52+5:30

गोव्यातील आश्रमात धडक; ‘एसआयटी’चे पथक दोन दिवस तळ ठोकून

'Sanatan's Athavale' questioned | ‘सनातन’च्या आठवले यांची चौकशी

‘सनातन’च्या आठवले यांची चौकशी

Next

विश्वास पाटील --- कोल्हापूर ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी गोव्यातील सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंगळवारी व बुधवारी कसून चौकशी केली. ही चौकशी सुमारे साडेतीन तासांहून जास्त काळ सुरू होती; परंतु चौकशीतील तपशिलांबाबत फारशी माहिती पोलिस यंत्रणेकडून उपलब्ध होऊ शकली नाही.
पानसरे खूनप्रकरणाचे तपास अधिकारी सुहेल शर्मा, सहायक पोलिस निरीक्षक रमेश खुणे व फौजदार रमेश ढाणे यांच्या पथकाने ही चौकशी केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. हे तिघेही अधिकारी
साध्या वेशात गेले होते. तिथे त्यांनी गोवा मडगाव येथील स्थानिक पोलिसांचीही चौकशीसाठी मदत घेतली; परंतु त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली
होती. पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी जे तीन प्रमुख संशयित
आहेत त्या सारंग अकोळकर, विनय पवार आणि डॉ. वीरेंद्र तावडे हे सनातन
संस्थेचे साधक आहेत.
पानसरे खून प्रकरणातील संशयित समीर गायकवाड हा देखील ‘सनातन’चा पूर्ण वेळ साधक होता. या चौघांचेही गोवा आश्रमात वास्तव्य होते. त्यातील समीर गायकवाड सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याचे वास्तव्य कळंबा मध्यवर्ती कारागृहात आहे. तावडे हा देखील न्यायालयीन कोठडीत असून, तो येरवडा कारागृहात आहे. सारंग अकोळकर व विनय पवार हे दोघेही गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटापासून फरार आहेत. त्या स्फोटातही त्यांचा सहभाग होता, असा अकोळकर व विनय पवार यांच्यावर संशय आहे. पानसरे खूनप्रकरणात या दोघांनीच पानसरे यांच्यावर गोळ््या झाडल्याचा पोलिसांचा आरोप आहे व तसा उल्लेख पुरवणी दोषारोपपत्रातही आहे; परंतु ते गेल्या सुमारे आठ वर्षांपासून फरार असल्याने त्यांच्याबाबतची विचारपूस करण्यासाठी ‘एसआयटी’च्या पथकाने डॉ. आठवले यांची चौकशी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पथकाने ‘सनातन’च्या आश्रमाची व तिथे काय स्वरूपाचे व्यवहार चालतात, किती साधक आहेत, त्यांना कोणते प्रशिक्षण दिले जाते यासंबंधीची माहिती जाणून घेतली. बुधवारीच सीबीआयने अकोळकर व विनय पवार यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पानसरे खूनप्रकरणातही महाराष्ट्र सरकारने माहिती देणाऱ्यास २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ ला ते त्यांच्या सागरमाळ परिसरातील निवासस्थानी मॉर्निंग वॉकहून परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा बुरखाधाऱ्यांनी गोळ््या झाडल्या. त्यात ते आणि त्यांच्या पत्नी उमा गंभीर जखमी झाल्या होत्या. २० फेब्रुवारी २०१५ ला उपचार सुरू असताना पानसरे यांचा मृत्यू झाला तर पत्नी उमा यांच्या डोक्याला गोळी चाटून गेली होती त्या सुदैवाने बचावल्या. कसोशीने प्रयत्न व चौकशी करूनही अकोळकर व पवार यांच्याबद्दल पोलिसांना आतापर्यंत कोणताच सुगावा लागलेला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी सनातन संस्थेची थेट गोव्यात जावून चौकशी सुरू केली असल्याचे या सूत्रांनी सांगितले.


सुहेल शर्मा यांची बदली होण्याची शक्यता..
पानसरे खून खटल्याचे तपास अधिकारी सुहेल शर्मा यांची पदोन्नतीने बदली होण्याची शक्यता आहे. पानसरे खून प्रकरणाचा तपास अगदी सुरुवातीला तत्कालीन पोलिस उपअधीक्षक अंकित गोयल, त्यानंतर एस. चैतन्या, दिनेश बारी व त्यानंतर सध्या सुहेल शर्मा करत आहेत.
ते गेले आठ महिने या प्रकरणाचा तपास करीत आहेत; परंतु त्यांची पदोन्नतीवर बदली होणार असून, त्याचा तपासकामावर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयानेही वारंवार तपास अधिकारी बदलण्याबद्दल नापसंती व्यक्त केली आहे.


गोव्यातील ‘सनातन’ संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची आश्रमात जाऊन मंगळवारी आणि बुधवारी विशेष पोलिस पथकाने चौकशी केली; परंतु चौकशीचा तपशील सांगता येणार नाही.
- सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक

Web Title: 'Sanatan's Athavale' questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.