शिवसेनेकडून सनातनची पाठराखण
By admin | Published: September 22, 2015 01:30 AM2015-09-22T01:30:04+5:302015-09-22T01:30:04+5:30
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजपाचे आव्हान पेलताना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार असल्याने शिवसेनेने हिंदुत्ववादी मते आपल्या पदरात पडावी याकरिता सनातन या वादग्रस्त संघटनेची पाठराखण केली आहे
मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजपाचे आव्हान पेलताना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार असल्याने शिवसेनेने हिंदुत्ववादी मते आपल्या पदरात पडावी याकरिता सनातन या वादग्रस्त संघटनेची पाठराखण केली आहे. खऱ्या गुन्हेगारांना सोडू नका, पण हिंदुत्वाला बदनाम करणाऱ्या सुुपाऱ्या वाजवू नका, असा टोला गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुखपत्रातून लगावला आहे.
कल्याण-डोंबिवली अथवा मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपाचेच आव्हान आहे. भाजपाने हिंदुत्वापेक्षा सध्या विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य दिले आहे.
त्यातच भाजपा प्रणीत सरकार असताना व गृहखाते भाजपाकडे असताना ‘सनातन’ या हिंदुत्ववादी संघटनेवर पानसरे हत्येकरिता कारवाई झाल्यामुळे सनातन संस्थेला पाठिंबा देऊन हिंदुत्वाची कास आपण कदापि सोडणार नाही, असे संकेत शिवसेनेने दिले आहेत.
पानसरे, दाभोलकरांचे खरे खुनी शोधायलाच हवेत; मात्र त्यासाठी गायकवाडला विनाचौकशी फासावर लटकवा व सनातनवर लगेच बंदी घाला अशी डबडी वाजू लागली आहेत. हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे, असे मुखपत्रात म्हटले आहे.
पुरोगामी लोक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मिळणाऱ्या धमक्यांबाबत मात्र तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसले होते. हे ढोंग आहे व आता पानसरे हत्या प्रकरणात सनातनवर बंदी घालण्यासाठी हेच सर्व निधर्मी म्हणवून घेणारे हिंदूंचेच देव पाण्यात घालून बसले आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे. (विशेष प्रतिनिधी)