सनातनच्या तावडेला पोलीस कोठडी
By admin | Published: June 12, 2016 04:02 AM2016-06-12T04:02:24+5:302016-06-12T04:02:24+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला शनिवारी संध्याकाळी शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला शनिवारी संध्याकाळी शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एम. शेख यांनी डॉ. तावडेला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या दरम्यान, आपल्याला सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दोनदा थापडा मारल्याची तक्रार त्याने न्यायालयाकडे केली.
सीबीआयच्या पथकाने तावडेला शुक्रवारी मुंबईच्या कार्यालयामध्ये चौकशीला बोलावल्यानंतर तेथेच अटक केली होती. शनिवारी त्याला पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयचे वकील अॅड. बी. पी. राजू यांनी तावडे तपासात सहकार्य करीत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. गोव्यातील मडगावमध्ये २००९ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी सारंग अकोलकर याच्याशी त्याचा ईमेलद्वारे २००८मध्ये संपर्क झालेला आहे. त्याने २००४ साली कोल्हापुरात दाभोलकर यांच्याविरोधात वक्तव्य केल्याचा जबाब कोल्हापूरमधील एका साक्षीदाराने कलम १६४ नुसार सीबीआयला दिल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. दाभोलकरांच्या हत्येमध्ये काळ्या रंगाची मोटारसायकल वापरण्यात आली होती. तशीच दिसणारी मोटारसायकल तावडेकडे असून त्यातील साम्य सिद्ध करण्यासाठी तावडेच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली. यासोबतच तावडे वापरत असलेले तीनही मोबईल गुप्त संभाषणासाठी वापरले जात होते. त्याचाही तपास करायचा असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने तावडेला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तावडेला न्यायालयात हजर करण्यापूर्वीच न्यायालयामध्ये अंनिस आणि सनातनच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
तावडेच्या वकिलांनी आरोप फेटाळले
ही अटक केवळ संशयावरून करण्यात आली आहे. जुन्या संभाषणांच्या तारखा विचारून गोंधळ निर्माण करून डॉ. तावडे खोटे बोलत असल्याचे सिद्ध करण्याचा सीबीआयचा प्रयत्न असून ही अटक दाभोलकर कुटुंबीयांच्या दबावामधून झाल्याचा आरोप तावडेचे वकील अॅड. संजीव पुनावळेकर आणि अॅड. सुशीलकुमार पिसे यांनी केला.
अकोलकर २००९पासून फरार असून या दोघांमध्ये झालेला संवाद हा २००८ सालचा आहे. त्यावेळी डॉ. दाभोलकर होते आणि अकोलकर माध्यमांसमोर सतत बोलत होता. त्यामुळे हत्येशी तावडेचा संबंध जोडणे योग्य नसल्याचे सांगत तावडेच्या घरातून काहीही हस्तगत करण्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.