‘समृद्धी’च्या दरपत्रकाची होळी!
By admin | Published: July 9, 2017 01:02 AM2017-07-09T01:02:31+5:302017-07-09T01:02:31+5:30
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी सरकारने शुक्रवारी हेक्टरी लाखो रुपये दर जाहीर केल्यानंतरही शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.
- लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी सरकारने शुक्रवारी हेक्टरी लाखो रुपये दर जाहीर केल्यानंतरही शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. शनिवारी शिवडे व नाशिक येथे संतप्त शेतकऱ्यांनी दरपत्रकाची होळी करून निषेध नोंदविला.
शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनानेही तातडीने तलाठ्यांची बैठक घेऊन जमिनीच्या थेट खरेदीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व किसान सभेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केल्याने नजीकच्या काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील जमीन मालकांसाठी जिल्हा समितीने दर निश्चिती केले असून, थेट खरेदीने जमीन देण्यास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना ४८ तासांत पैसे अदा केले जातील. सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी शासनाला जमीनच द्यायची नाही तर दर कशाला देता, असा सवाल केला. शासनाने जाहीर केलेल्या दराबाबत निर्णय घेण्यासाठी समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीची तातडीची बैठक आयटक कार्यालयात अध्यक्ष राजू देसले यांनी घेतली. बैठकीत बागायती, जिरायती असा दर जाहीर करून शासन शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ४० ते ६० लाख रुपये हेक्टरी दर ही एकत्र कुटुंब पद्धतीच्या गुजराणासाठी पुरेशी नाही. याविरोधात उच्च न्यायालयात ३१ याचिका दाखल झाल्या असून, शासन न्यायालयाच्या नोटिसांना उत्तरे देत नसल्याबद्दल संताप व्यक्त झाला.
समृद्धी मार्ग बदला
शासकीय अधिकाऱ्यांनी बागायती जमिनी जिरायती दाखविल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली. समृद्धीचा मार्ग बदलावा, एकही शेतकरी जागा देणार नाही, असा निर्धार बैठकीत करण्यात आला. या प्रकरणी उच्च न्यायालयातही याचिका दाखल आहेत़ या याचिकांचे शासन प्रत्युत्तर सादर करत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला़