48 लाखांचे टेंडर मंजूर, आषाढी वारीपूर्वी होणार काम पूर्ण
By admin | Published: April 21, 2016 10:53 PM2016-04-21T22:53:09+5:302016-04-21T22:53:09+5:30
दर्शन मंडपापासून ते सारडा भवन येथील चंद्रभागा घाटापर्यंत स्काय वॉक अर्थात लोखंडी पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली.
Next
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २१- वारीच्या कालावधीत विठ्ठलाच्या दर्शनाची बारी ज्ञानेश्वर सभामंडपाच्या बाहेर रस्त्यावरून जाते, त्यामुळे भाविकांना आणि वाहतुकीलाही अडथळा येतो, त्यामुळे दर्शन मंडपापासून ते सारडा भवन येथील चंद्रभागा घाटापर्यंत स्काय वॉक अर्थात लोखंडी पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली.
गुरुवारी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. कादबाने म्हणाले की, ज्ञानेश्वर सभामंडपाच्या पाठीमागील गेटपासून ते उज्ज्वला सेतू आणि तेथून वीणो गल्लीमार्गे चंद्रभागा घाटापर्यंत हा स्काय वॉक बांधण्यात येणार आहे. जमिनीवर लोखंडी रॉड उभा करून त्यावर हा सुमारे पाच फुटांचा पत्रा टाकून हा पूल उभा करण्यात येणार असून, तो कायमस्वरूपी करण्यात येणार आहे.
विठ्ठल-रुक्मिणी या मंदिराला मूळरूप आणण्यासाठी मंदिराचे नूतनीकरण करण्याचा निर्णय समितीने घेतला असून, 68 लाख रुपये खर्चून, केमिकल वापरून पुरातत्त्व विभागाकडून मंदिरातील दगडाला पॉलिश आणि गुळगुळीत करण्यात येणार आहे.
याचबरोबर पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या स्वच्छतेबाबतचा प्रश्न हायकोर्टात गेल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने शौचालये बांधण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यानुसार मंदिर समितीने दीड कोटी रुपये खर्चून एक हजार पाच शौचालये बांधली असून, अद्याप 150 शौचालयांची कामे सुरू आहेत. शहरातील नोंदणीकृत 125 मठांमध्ये 105 शौचालये बांधून दिली आहेत. याचबरोबर मंदिर समितीने उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करीत असून, परिवार देवतांच्या विकासासाठीही प्रयत्न करीत आहे.
28 परिवार देवतांपैकी रिद्धी-सिद्धी, यमाई-तुकाई, अंबाबाई या मंदिरांकडे जागा जास्त प्रमाणात असल्यामुळे मंदिर समितीने यांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे भविष्यात या मंदिरात भाविकांची संख्या वाढून उत्पन्नवाढीस मदत होणार आहे. 28 परिवार देवतांच्या मंदिरासाठी 18 पुजारी, 36 सेवक असून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात 11 पुजारी, 35 सेवक असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
550 पैकी 335 हेक्टरवर समितीचे नाव
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची 19 जिल्ह्यांमध्ये 550 हेक्टर जमीन आहे. या जमिनींचा शोध मंदिर समितीने घेतला असून यापैकी 335 हेक्टर जमिनीवर मंदिर समितीचे नाव लावण्यात आले आहे, तर 20 हेक्टर जमिनीचे न्यायालयात दावे सुरू आहेत. यापैकी 54 हेक्टर जमीन एक वर्षाच्या कराराने शेतक-यांना कसण्यास दिली असून, यामधून वर्षभरात 5 लाखांचे उत्पन्न मिळाल्याचेही कादबाने यांनी सांगितले.
सध्या मंदिर समितीकडे 80 कायम, 60 मानधनावर तर 160 हंगामी कर्मचारी आहेत. यांना नियमित सेवेवर घेण्याकरिता 30 कर्मचा-यांचा आकृतिबंध प्रस्ताव शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आल्याचेही कादबाने यांनी सांगितले.
30 कर्मचा-यांचा आकृतिबंध प्रस्ताव शासनाकडे