आषाणे रस्त्यासाठी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

By Admin | Published: August 24, 2016 03:00 AM2016-08-24T03:00:27+5:302016-08-24T03:00:27+5:30

कर्जत तालुक्यातील आषाणे -ठाकूरवाडी रस्त्याबाबत येथील आदिवासी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली

In the sanctity of village movement for Ashan's road | आषाणे रस्त्यासाठी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

आषाणे रस्त्यासाठी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

googlenewsNext

कांता हाबळे,

नेरळ- कर्जत तालुक्यातील आषाणे -ठाकूरवाडी रस्त्याबाबत येथील आदिवासी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून या रस्त्याचे बांधकाम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या रस्त्याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवला होता. या रस्त्याबाबत वस्तुस्थितीचे दर्शन घडवणारे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर बातमी चुकीची असल्याचा कांगावा केला. मात्र आदिवासी ग्रामस्थांनी या बातमीला दुजोरा देत ही बातमी खरी असून ठाकूरवाडी रस्ता झालेला नाही असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच मंजूर रस्त्याचे बांधकाम सुरु न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
या रस्त्याबाबत मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक कार्यालय मुंबई, अधीक्षक अभियंता, रायगड सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण भवन यांना लेखी निवेदन दिले असून त्यावर ८० ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली तरी रस्ता नाही. वाडीतील ३०० ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होत आहेत. कुणी आजारी असल्यास त्याला झोळी करून पायवाटेने डोंगर माथ्यावरून खाली आणावे लागते. विद्यार्थ्यांना नेरळ येथे शिक्षणासाठी दोन तास पायपीट करीत यावे लागते. या रस्त्याबाबत शासकीय मंजुरी आदेश २८ आॅगस्ट २०१४ रोजी निर्गमित आहेत. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी रस्त्यांचे काम झाले नाही.
रस्त्याबाबत आदिवासी बांधवांनी आधी रस्ता दाखवा अशी रोखठोक भूमिका घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची चांगलीच पंचाईत झाली आहे. हा रस्ता तांत्रिक मंजुरी प्राप्त झाल्यानंतर कार्यारंभ आदेशानुसार बांधून पूर्ण केला असल्याचे सा.बां. विभाग सांगत आहे. जर हा रस्ता पूर्ण केला आहे तर मग तो आषाणेपासून ठाकूरवाडीपर्यंत असायला हवा. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता झालेलाच नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता चंद्रशेखर सहनाल यांच्याशी अनेकवेळा संपर्क करूनही आषाणे -ठाकूरवाडी रस्त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. कार्यालयात अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कार्यालयात नसल्याचे अनेक वेळा दिसून आले.
>सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कामाचा बोजवारा
कर्जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक कामांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे आधीच प्रसिद्धी माध्यमांच्या रडारवर असलेल्या बांधकाम विभागास स्थानिक जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. ‘लोकमत’ने २२ जून रोजी आषाणे -ठाकूरवाडी या केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या रस्त्याची वस्तुस्थिती स्पष्ट करणारी बातमी प्रसिद्ध केली आणिशासकीय गोटात एकच खळबळ उडाली. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
>आषाणे ते ठाकूरवाडी हा रस्ता कागदोपत्री पूर्ण आहे. आषाणे भागात काही काम झाले. आषाणे गावापासून ठाकूरवाडीपर्यंत वन विभागाची जागा असल्याने हे काम अर्धवट आहे. जर रस्ता पूर्ण झालाच नाही तर बांधकाम पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र कुठल्या आधारे दिले आहे.
- गो. रा. चव्हाण, माहिती अधिकार कार्यकर्ते, डिकसळ

Web Title: In the sanctity of village movement for Ashan's road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.