समृद्धी महामार्ग न झाल्यास नुकसानच!
By admin | Published: May 29, 2017 05:10 AM2017-05-29T05:10:00+5:302017-05-29T05:10:00+5:30
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे चित्र बदलण्याची समृद्धी महामार्गात क्षमता आहे. तो न झाल्यास नुकसानच होणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे चित्र बदलण्याची समृद्धी महामार्गात क्षमता आहे. तो न झाल्यास नुकसानच होणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करूनच त्यांच्या जमिनी राज्य सरकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले.
समृद्धी महामार्गाच्या एकूण ७०० किलोमीटरपैकी ६७० कि.मी.ची मोजणी झालेली आहे. मात्र, काहींचा जमिनी देण्यास विरोध आहे. अर्थात विरोध असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे समाधान करूनच त्यांच्या जमिनी घेतल्या जातील, असे ते म्हणाले.
नाशिकचा एकलहरे वीजप्रकल्प हलविण्याचे कारण नाही. प्रश्न वीजनिर्मितीचा नसून, विजेचे भाव कसे कमी करायचे व वितरण कसे करायचे, याबाबत विचार होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
संपाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करू
१ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काही शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. काही शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. कृषिमंत्र्यांनी त्यांना चर्चेचे निमंत्रणही दिले आहे, परंतु शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे समाधान केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विरोध करणाऱ्यांना केली अटक
भगूरमध्ये समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात निषेध करण्याचा प्रयत्न केला. तो पोलिसांनी उधळून लावला. शेतकऱ्यांना ताब्यात घेताना, पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.