पंढरपुरात मंडल अधिकाऱ्यासह पथकावर वाळू माफियांचा हल्ला
By Admin | Published: June 24, 2016 10:19 PM2016-06-24T22:19:11+5:302016-06-24T22:19:11+5:30
पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथे अवैध वाळू उपसावर कारवाई करण्यासाठी गेलेले मंडल अधिकारी व त्यांच्या पाच जणांच्या पथकाला वाळू माफियांनी जबर मारहाण केली़ या प्रकरणी सात
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.२४ - पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथे अवैध वाळू उपसावर कारवाई करण्यासाठी गेलेले मंडल अधिकारी व त्यांच्या पाच जणांच्या पथकाला वाळू माफियांनी जबर मारहाण केली़ या प्रकरणी सात जणांविरूद्ध करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मंडल अधिकारी एस. एम. काझी यांनी तक्रार दिली आहे.
शुक्रवारी सकाळी उंबरे येथील कोतवाल पुंडलिक शिंदे यांनी उंबरे येथील भीमा नदीच्या पात्रात जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती दूरध्वनीवरून दिली. यानंतर मंडल अधिकारी एस. एम. काझी, त्यांचे सहकारी सुशील तपसे (पेहे तलाठी), विलास शिंदे (उंबरे तलाठी), प्रशांत शिंदे (करकंब तलाठी), पांडुरंग वाघमारे (कोतवाल पेहे), महादेव मंडले (कोतवाल सांगवी) असे सहा जणांचे पथक उंबरे येथील भीमानदी पात्रात गेले. त्याठिकाणी एक जेसीबी व सात ट्रॅक्टरच्या सहाय्याने महादेव उर्फ बापू अंकुश कानगुडे व त्यांचे जेसीबी व ट्रॅक्टर चालक याठिकाणी वाळू उपसा करताना निदर्शनास आले.अधिकृत रॉयल्टीच्या पावत्यांची विचारणा केल्यानंतर वाळू माफीयांनी पथकाला दगड मारण्यास सुरूवात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
याविषयी अंकुश देवू कानगुडे (रा. उंबरे), महादेव उर्फ अंकुश कानगुडे, अनिल सर्जेराव सुरवसे, कैलास सिद्धनाथ ढोबळे, गणपत भारत कानगुडे, लक्ष्मण नारायण मोरे आदींनी ४२ हजार रूपयांची वाळू चोरी व शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास करकंब पोलीस करीत आहेत.
मागणी करूनही पोलीस संरक्षण मिळाले नाही
नेमतवाडी परिसरात वाळू चोरांवर कारवाई करण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांसह पाच जणांच्या पथकाची पंढरपूरच्या तहसीलदारांनी नेमणूक केली होती. त्यानुसार मंडल अधिकारी एस. एम. काझी यांनी शुक्रवार व शनिवारी कारवाई करताना पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी करकंब पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. मात्र हा प्रकार शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडल्यानंतर तब्बल दोन तासांनी त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले. यावरून वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीस किती दक्ष आहेत, याचा प्रत्यय येतो. त्यांना वेळेत संरक्षण दिले असते तर आजचा हा प्रकार घडला नसता.
पोलिसांचे भय राहिले नाही
करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम वाळू चोरी, जुगार, मटका, दारू विक्री असे अनेक अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. अवैध व्यवसाय रोखण्यासाठी गेलेल्या महसूल व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही त्या गुन्हेगारांना भय राहिले नसून चक्क त्यांच्यावर हल्ला चढविण्यापर्यंत या अवैध व्यावसायिकांची मुजोरी वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस आता तरी आमची दखल घेतील का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येत आहे.
आपण शुक्रवारी पालकमंत्र्यांसोबत आषाढी यात्रा नियोजनाच्या बैठकीत दिवसभर व्यस्त होतो. सायंकाळी उशिरा ही घटना आपणाला समजली. याबाबत आपण सविस्तर माहिती घेत असून गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी वाट्टेल ते सहकार्य आमच्या मंडल अधिकारी व त्यांच्या पथकांना करण्यात येईल. भविष्यात वाळू चोरांवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल.
- नागेश पाटील
तहसीलदार, पंढरपूर