वाळू तस्करी समाजविघातक गुन्हा

By admin | Published: October 13, 2016 05:31 AM2016-10-13T05:31:10+5:302016-10-13T05:31:10+5:30

नद्यांच्या पात्रांतून वाळूची तस्करी करणे हा गुन्हा वैयक्तिक स्वरूपाचा नसून, ते सार्वजनिक सुव्यवस्थेस मारक ठरणारे दुष्कृत्य आहे, असा निर्वाळा देत,

Sand smuggling | वाळू तस्करी समाजविघातक गुन्हा

वाळू तस्करी समाजविघातक गुन्हा

Next

मुंबई : नद्यांच्या पात्रांतून वाळूची तस्करी करणे हा गुन्हा वैयक्तिक स्वरूपाचा नसून, ते सार्वजनिक सुव्यवस्थेस मारक ठरणारे दुष्कृत्य आहे, असा निर्वाळा देत, मुंबई उच्च न्यायालयाने जळगाव जिल्ह्याच्या भादगाव तालुक्यातील एका वाळू तस्कराच्या स्थानबद्धतेवर शिक्कामोर्तब केले आहे.
गिरणा नदीच्या पात्रातून वाळूची तस्करी करणे आणि ती करीत असताना गावकऱ्यांना दमदाटी व मारहाण करणे व प्रसंगी सरकारी अधिकाऱ्यांवरही हल्ला करणे अशा कारणांवरून जळगावच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नीलेश ज्ञानेश्वर देसले याच्याविरुद्ध १६ मार्च रोजी स्थानबद्धता आदेश काढला होता. नीलेशचा मित्र हरीश पाटील याने याविरुद्ध केलेली रिट याचिका फेटाळताना न्या. विजया कापसे-ताहिलरामाणी व न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्वाळा दिला.
देसले यास पूर्वी फौजदारी गुन्ह्यांत रीतसर अटक झाली होती, परंतु स्थानिक न्यायालयाने त्यास जामिनावर सोडले. त्यानंतर, दोन साक्षीदारांनी नोंदविलेल्या ‘इन कॅमेरा’ जबानीच्या आधारे त्याच्यावर ही स्थानबद्धतेची कारवाई केली गेली. देसले गावकऱ्यांना कशी दमदाटी करतो, त्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना रात्री त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी जाणेही कसे मुश्कील होते व देसले आणि त्याच्या माणसांनी एक-दोन वेळा सरकारी अधिकाऱ्यांवरही कसे हात उगारले, याची माहिती या साक्षीदारांनी दिली होती.
देसले याच्या वतीने इतर मुद्द्यांखेरीज असाही मुद्दा मांडला गेला की, साक्षीदारांनी दिलेली जबानी वादासाठी खरी मानली, तरी तिचे स्वरूप व्यक्तिगत स्वरूपाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडल्याचे किंवा बिघडू शकेल, अशी परिस्थिती असल्याचे दिसत नाही. हे अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, या कृत्यांकडे एकाकीपणे पाहता येणार नाही. वाळू तस्करीचा एकूणच त्या भागातील पर्यावरण, शेती, पाणी इत्यादींवर होणारा दुष्परिणाम आणि गावकऱ्यांना दमदाटी व सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण यामुळे निर्माण होणारी दहशत याचा एकत्र विचार करता, देसले याची कृत्ये सार्वजनिक सुव्यवस्थेस मारक अशीच ठरतात.
न्यायालय म्हणते की, सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे शांतता, सुरक्षा व समाजजीवन सुरळीतपणे चालणे. वाळू ही नदीपात्रामध्ये सहजपणे मिळणारी वस्तू असली, तरी तिचे जतन करणे स्थानिक लोकांच्या हितासाठी आवश्यक आहे. नदीपात्रांमधून बेसुमार वाळू काढणे व तिची तस्करी करणे याचे गंभीर परिणाम दिसून आलेले आहेत. अनिर्बंध वाळूउपशामुळे जलपातळी खालावते व त्यामुळे पिण्यासाठी, तसेच शेतीसाठी पाण्याच्या तुटवडा निर्माण होते. पर्यावरणाचा ऱ्हास होण्याखेरीज शेतकऱ्यांचे व स्थानिक नागरिकांचे आर्थिक नुकसानही होते. या सर्वाचा एकत्रित परिणाम सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्यात होतो. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Sand smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.