ओढे झाले वाळू वॉशिंग सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 01:31 AM2016-08-24T01:31:10+5:302016-08-24T01:31:10+5:30

हवेली तालुक्यातील नायगाव-प्रयागधाम येथील रस्त्यालगत असणाऱ्या शासकीय ओढ्याच्या शेजारील जागा वाळू वॉशिंग सेंटर ठरले आहे

Sand washing washing center | ओढे झाले वाळू वॉशिंग सेंटर

ओढे झाले वाळू वॉशिंग सेंटर

googlenewsNext


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील नायगाव-प्रयागधाम येथील रस्त्यालगत असणाऱ्या शासकीय ओढ्याच्या शेजारील जागा वाळू वॉशिंग सेंटर ठरले आहे. भर दिवसा या ठिकाणी ट्रकमधील मातीमिश्रित वाळू धुतली जाते. यामुळे पाण्यामध्ये आॅईल व डिझेल मिसळत असल्याने ओढ्यातील पाणी शेती व पिण्यासाठी अयोग्य ठरत आहे. मातीमिश्रित पाणी व गाळामुळे येथील पाण्याचे स्रोत दूषित होण्याची भीती निर्माण झाली आहे.
अवैध वाळू धुण्याच्या व्यवसायासाठी या ठिकाणी अनधिकृतपणे डिझेल इंजिनचा वापर करून विद्युत पंपाच्या साह्याने ओढ्यातील पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यामुळे ओढ्यातील पाण्यात डिझेल व आॅईलचा थर तयार होत आहे.
वाळू वाहतुकीमुळे आधीच येथील रस्त्याची चाळण झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाळू धुण्यासाठी प्रत्येक वाहनांमागे ठराविक रक्कम मिळत असल्याची माहिती आहे. यामुळे या ठिकाणी वाळू ट्रकच्या रांगा लागल्या असतात.
जिल्ह्यातील वाळू ठेक्याचे लिलाव न झाल्याने वाळूची मागणी जास्त व पुरवठा कमी, अशी स्थिती असल्याने वाळूला सोन्याचा भाव आला आहे. याचा फायदा वाळूव्यावसायिक घेत आहेत. चोरून आणलेली मातीमिश्रित वाळू धुण्यासाठी पूर्व हवेलीमध्ये ओढ्यालगत ठिकठिकाणी वाळू धुण्यासाठी वॉशिंग सेंटर थाटली आहेत. यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासाबरोबरच शासनाचा महसूलही बुडत आहे.
वाळू धुतल्यानंतर त्यातून निघालेली माती पुन्हा ओढ्यात जात असल्याने पाणी दूषित होत आहे. येथे धुण्यात आलेल्या वाळूची चोरटी वाहतूक करण्यासाठी नायगाव थेऊरमार्गे पुणे-सोलापूर अथवा पुणे-नगर महामार्ग अथवा कोलवडीमार्गे मांजरी या रस्त्याचा वापर करण्यात येत आहे.
या वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. अंधार पडल्यानंतर कोणत्याही गौणखनिजाची वाहतूक करू नये, हा नियम असतानाही वाळूची वाहतूक मात्र विनासायास होत आहे. याकडे महसूल, परिवहन व पोलीस खात्याचे दुर्लक्ष कसे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
(वार्ताहर)
>दोन महिन्यांत जैसे थे : कारवाईचे आदेश
१३ जानेवारी रोजी याबाबत ‘लोकमत’मध्ये याविषयी छायाचित्रासह
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या भागातील नागरिकांनी १५ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे या अवैध प्रकाराविषयी तक्रार केल्याने त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्याच दिवशी महसूल विभागाने त्याठिकाणी बेधडकपणे कारवाई केली होती. त्यानंतर मात्र दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर हा अवैध व्यवसाय पुन्हा सुरळीतपणे
सुरू झाला आहे.

Web Title: Sand washing washing center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.