Video - "प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा..."; नव्या गाण्यासह दमदार टिझर, 9 मार्चला 'राजगर्जना'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 12:11 PM2023-03-01T12:11:06+5:302023-03-01T12:17:58+5:30
MNS Sandeep Deshpande : नव्या गाण्यासह मनसेच्या वर्धापनदिन सभेचा टिझर जारी करण्यात आला आहे.
9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन आहे. नव्या गाण्यासह मनसेच्या वर्धापनदिन सभेचा टिझर जारी करण्यात आला आहे. यादिवशी 'राजगर्जना' घमुणार आहे. "प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा... नवनिर्माण घडवूया... मनसे" या दमदार गाण्याचा टिझर सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी वर्धापन दिनाचा टिझर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यासोबतच 'प्रतीक्षा नऊ मार्चची' असं म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजातील काही वाक्य या व्हिडीओच्या सुरुवातीला ऐकायला मिळत आहेत. यामध्ये "महाराष्ट्र लढवय्या आहे. जे जे काही मिळवलं आहे ते आजपर्यंत लढून मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करू नका. शिवरायाचा तिसरा नेत्र उघडला तर सगळेच भस्मसात व्हाल" असं राज ठाकरे म्हणताना दिसत आहेत. तसेच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे देखील टिझरमध्ये दिसत आहेत. यासोबतच "प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा... नवनिर्माण घडवूया... मनसे" हे गाणं देखील आहे.
प्रतीक्षा नऊ मार्चची pic.twitter.com/FDN5nSgtIm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 1, 2023
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटाला मोठा धक्का बसला आहे. या घडामोडींबाबत एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं. महाराष्ट्रात सध्या हे जे काही चालू आहे त्यावर मी 22 तारखेला शिवतीर्थावर गुढीपाडव्यादिवशी सविस्तर बोलणार आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पनवेलमध्ये आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी विविध मुद्द्यांसोबत राज ठाकरेंनी शिवसेनेतील फूट आणि महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीबाबत संक्षिप्त भाष्य केलं. यावेळी मनसेचा एकच आमदार आहे. त्याने पक्ष आणि चिन्हावर दावा केला, तर काय निवडणूक आयोग काय करणार, या अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता, राज ठाकरे म्हणाले की, काय आहे ना की, म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो. महाराष्ट्रात हे जे काही चालू आहे त्यावर मी 22 तारखेला शिवतीर्थावर गुढीपाडव्यादिवशी सविस्तर बोलणार आहे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"