...म्हणून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भीती; मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 08:33 AM2024-06-23T08:33:56+5:302024-06-23T08:34:38+5:30
लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना लक्ष्य केले. त्यावरून मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद पेटला आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्षांच्या हालचाली सुरू झाल्यात. मनसेनेही विधानसभेची तयारी सुरू केलीय. नुकतेच उद्धव ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंब्यावरून राज ठाकरेंची खिल्ली उडवली त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात शाब्दिक संघर्ष दिसून येत आहे. मनसेवर कधीही न बोलणारे उद्धव आणि आदित्य ठाकरे हे आता मनसेवर बोलतायेत. कारण त्यांच्या मनात भीती आहे असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
एका मुलाखतीत संदीप देशपांडे म्हणाले की, जसजसं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकत आहे तसं ते मनसेवर बोलायला लागलेत. याआधी ते आमच्यावर बोलायला तयार नव्हते. आज लोकांचा प्रतिसाद आणि राज ठाकरेंना मिळणारा पाठिंबा यामुळे त्यांना भीती वाटतेय. लोकसभा निवडणुकीत मराठी माणसांची मते त्यांना मोठ्या प्रमाणात पडली नाहीत. त्यामुळे त्याची भीतीही त्यांच्या मनात बसली आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय केवळ वरळीच नाही तर इतर विधानसभा मतदारसंघातही मनसेची तयारी सुरू आहे. वरळी त्यातील एक आहे. मागील काही दिवसांत अनेक बैठका घेण्यात आल्यात. कार्यकर्त्यांना सक्रीय केले जात आहे. आम्ही लोकांशी बोलतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय. वरळीत जे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आहेत, ते ५ वर्ष लोकांशी बोलले नाहीत. त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही. लोकांना याचं दु:ख आहे. ज्या विश्वासाने लोकांनी निवडून दिले, ते आमदार भेटत नाहीत, संपर्कात राहत नाही त्यामुळे ते नाराज आहेत असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
दरम्यान, आम्हाला २००-२२५ जागांवर लढण्याची तयारी ठेवा, असा आदेश राजसाहेबांनी दिलाय. त्यामुळे त्या त्या मतदारसंघात मनसेची तयारी सुरू झाली आहे. पुढील काळात काय होईल हे सांगता येत नाही. अद्याप युतीबाबत कुठलीही बोलणी नाही. जो काही निर्णय असेल ते राज ठाकरे घेतील. मागील २ विधानसभा निवडणुकीत मनसेचा परफॉर्म्स चांगला नसला तरी मतांमध्ये आमच्या वाढ झालीय. २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत मनसेला अधिक मते मिळाली आहेत. कोरोना काळात मनसेनं जे काम केलं, महाराष्ट्रात राजकारणाची खिचडी झालीय त्यामुळे लोकांमध्ये इतर पक्षांबद्दल राग आहे. त्यात मनसेकडे पर्याय म्हणून लोक बघतायेत असा दावाही संदीप देशपांडे यांनी केला.
...तर मी लढेन आणि जिंकेनही
अमित ठाकरे प्रत्येक ठिकाणी बैठका घेत आहेत. त्यात वरळी मतदारसंघ हा एक भाग आहे. ते वरळीतून निवडणूक लढतील असं काही नाही. जो योग्य उमेदवार असेल त्याला तिकीट दिलं जाईल. मला उमेदवारी मिळाली तर पूर्ण ताकदीने मी वरळीतून उभा राहीन आणि जिंकेन असा विश्वास देशपांडेंनी व्यक्त केला.