मावळ गोळीबाराची याचिका निकाली संदीप कर्णिक यांना क्लीन चिट
By admin | Published: April 24, 2015 01:54 AM2015-04-24T01:54:59+5:302015-04-24T01:54:59+5:30
चार वर्षांपूर्वीच्या मावळ गोळीबार प्रकरणात पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक व मुंबईचे आताचे परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांना खातेनिहाय
मुंबई : चार वर्षांपूर्वीच्या मावळ गोळीबार प्रकरणात पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक व मुंबईचे आताचे परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांना खातेनिहाय चौकशीत निर्दोष ठरवून त्यांना केवळ समज देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिल्याने कर्णिक यांना ‘क्लीन चिट’ मिळाली.
मावळ गोळीबारासाठी पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक व इतर अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका ईश्वर खंडेलवाल यांनी केली होती. न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन ही याचिका निकाली काढली़ पवना धरणाच्या पाण्यासाठी ८ आॅगस्ट २०११ रोजी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते़ यावर पोलिसांनी गोळीबार केला़ यात काही शेतकऱ्यांचा बळी गेला़ मात्र या गोळीबाराची आवश्यकता नव्हती़ तत्कालीन पोलीस अधीक्षक कर्णिक यांनी जाणीवपूर्वक गोळीबाराचे आदेश दिले़ यासाठी इतर पोलीस अधिकारीही जबाबदार आहेत़ तसेच कर्णिक यांच्या गोळीने एका महिलेचाही जीव गेला़ तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती़ याचे प्रत्युत्तर सादर करताना राज्य शासनाने या अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी केल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले़ मुळात कर्णिक यांनी जमावाला आटोक्यात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला होता व यासाठी रबराच्या गोळ्यांचा वापर केला होता़ तरीही कर्णिक यांना समज दिली आहे़ पोलीस अधिकारी अशोक पाटील, यशवंत गवारी व गणेश माने यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचेही शासनाने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले होते.