संदीप सावंत मारहाणप्रकरण; निलेश राणे यांचा जामीन फेटाळला
By admin | Published: May 20, 2016 11:16 AM2016-05-20T11:16:43+5:302016-05-20T19:48:38+5:30
काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आज शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांचा जामीन अर्ज चिपळूण न्यायालयाने फेटाळला आहे.
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. २० : काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आज शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांचा जामीन अर्ज चिपळूण न्यायालयाने फेटाळला आहे. राणे यांच्यावतीने तत्काल खेड येथील जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयात अपील करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप सावंत मारहाण प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांना आज अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलेश राणे यांनी पोलिसांसमोर शरण झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आलेली.
न्यायालयात हजर करण्यापुर्वी निलेश राणे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर दुपारी चिपळूण न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस न्यायालयामध्ये राणे यांना सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्याची मागणी करणार आली होती. या प्रकरणात वापरण्यात आलेली गाडी मात्र पोलिसांना अद्याप सापडलेली नाही.
रत्नागिरीतील मराठा आरक्षण मेळाव्यास अनुपस्थित राहिल्याबद्दल राणे यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप शिवराम सावंत यांनी गेल्या महिन्यात केला होता. त्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पाचजणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र संदीपने मागितलेले पैसे मी दिले नाहीत, म्हणून त्याने माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचे सांगत निलेश राणेंनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावले होते. आपण कोणालाही मारहाण केली नसल्याचे सांगत इतर आपला कार्यक्रम यशस्वी होऊ नये म्हणून इतर पक्षांच्या साथीने रचलेला बनाव असल्याची टीका केली आहे. आपण सावंत यांना कोणतीही मारहाण केलेली नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी माझ्याकडे १० लाख रुपये मागितले होते, ते मी त्यांना देऊ शकलो नाही. याचाच राग मनात धरून सावंत इतर पक्षांकडे गेले आणि माझ्याविरुद्ध ही राजकीय खेळी रचली, असे राणे यांनी सांगितले. सावंत यांनी स्वत:लाच इजा करून घेतली आणि ते रुग्णालयात दाखल झाले, असेही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
रविवारी २४ एप्रिल रोजी रत्नागिरीत काँग्रेसच्यावतीने मराठा आरक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला तालुका अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे समर्थक संदीप सावंत जाऊ शकले नव्हते. याच गोष्टीचा राग मनात धरून २४ एप्रिल रोजी रात्री माजी खासदार निलेश राणे आणि तुषार, मनीष, अण्णा आणि कुलदीप खानविलकर हे कार्यक्रम संपल्यानंतर सावंत यांच्या घरी आले. त्यांना खाली बोलवून जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले. २५ एप्रिलला त्यांना मुंबई, जोगेश्वरी येथे सोडून देण्यात आले. त्यानंतर सावंत यांनी त्यांचे मावस भाऊ विनायक सुर्वे यांना फोन करून बोलवून घेतले. त्यांनी त्याला सोमवारी रात्री ठाण्यात आणून सिव्हील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सावंत यांच्या डोक्याला जबर मार लागला असून अंग काळेनिळे झाले आहे, असे सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. आपल्याला हॉकी स्टीक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची तक्रार जखमी सावंत यांनी ठाणे शहर पोलिसांकडे केली असून अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला.
आई आजारी असल्याने संदीप हे कार्यक्रमास गेले नाहीत, असे त्यांच्या पत्नी शिवानी यांनी सांगितले. त्याच रात्री निलेश राणे घरी आले आणि त्यांना नेहमीप्रमाणे घेऊन गेले. म्हणून त्या गोष्टीकडे सावंत कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले. पंरतु सकाळ झाली तरी संदीप घरी न आल्याने आम्ही काळजीत होतो. त्यांचा मोबाईल घरीच राहिल्याने आमदार नितेश राणे यांना सोमवारी सकाळी ६ वाजता फोन केला. त्यानंतर नारायण राणे यांच्या पत्नी निलमताईंना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यावर निलमताईंनी तुझा नवरा सुखरूप घरी येईल, त्याला काही होणार नाही, असे आश्वासन दिल्याचे शिवानी म्हणाल्या. हा प्रकार गैरसमजूतीतून झाला असल्याचेही त्या म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)