रायगड झेडपीचे माजी समाज कल्याण अधिकारी संदीप यादव यांची चौकशी सुरू
By Admin | Published: June 22, 2016 04:15 PM2016-06-22T16:15:53+5:302016-06-22T16:15:53+5:30
रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्य अधिकारी अविनाश गोटे यांची बनावट स्वाक्षरी करून समाज कल्याण विभागाचे करोडो रुपयांचे शासकीय अनुदान हडप
अमूल कुमार जैन
बोर्ली-मांडला /मुरुड, दि. 22- रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्य अधिकारी अविनाश गोटे यांची बनावट स्वाक्षरी करून समाज कल्याण विभागाचे करोडो रुपयांचे शासकीय अनुदान हडप केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश असताना सुद्धा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या समाज अधिकारी संदीप यादव यांना तात्काळ निलंबित करावे. तसेच या प्रकरणी सरकारतर्फे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी याबाबत अलिबाग येथील सामाजिक कायकर्ते संजय सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यहार केले होते. त्याच प्रमाणे संदीप यादव यांच्यासहित राज्यातील 20 समाज कल्याण अधिकारी यांची चौकशी होणार आहे.
संजय सांवत यांनी केलेल्या पत्रानुसार राज्य शासनाने रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन समाज कल्याण अधिकारी ( सध्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रायगड जिल्हा परिषदमधील महिला व बालकल्याण विभागात कार्यरत आहेत. ) संदीप यादव यांच्यासह राज्यातील एकूण २० समाजकल्याण अधिका-यांबाबत प्राप्त तक्रारीबाबत तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश समाज कल्याण विभागाच्या आयुक्तांना देण्यात आले आले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टचार झाला असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांच्या बनावट स्वाक्षरी करून करोडो रुपये हडप केले असल्याची वृत्ते अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केले होते.
सादर पत्रामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या मार्फत महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडीकरिता संच २०१४-१५ या सालामध्ये पूर्व शालेय संच ,शैक्षिनिक तक्ते व ज्ञानदशिका यांचे एकूण देयक रु . ९७ लक्ष, एसव्हीआर एकूण देयक रु. ९० लक्ष , खेळणी संच रु. ९० लक्ष असे एकूण रु. २ कोटी ७७ लक्षची खरेदी ही नियमबाह्य केली असल्याची जिल्हा परिषद सदस्य यांचीसुद्धा तक्रार होती. या तक्रारीबाबत समाज कल्याण अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे येथील कार्यालयाकडून कागदपत्रासह उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु ते उपस्थित राहिले नाही. याच विभागाने रु. ३१,७७,४०५/- च्या झेरॉक्स मशीन खरेदी करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून खरेदीची देयके काढली आहेत.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांनी त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून शासकीय अनुदान खर्च केला असल्याने संदीप यादव यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्याबाबत लेखी पत्र दिले होते.लेखी पत्र देऊनही समाज कल्याण अधिकारी संदीप यादव यांनी शासकीय अनुदान बनावट स्वाक्षरीने खर्च केल्याबाबत पोलिसात तक्रार दाखल नाही ही गंभीर बाब आहे. म्हणून या प्रकरणात समाज कल्याण अधिकारी संदीप यादव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संजय स्वतः यांनी पत्राद्वारे शासनाकडे केली होती. संदीप यादव यांच्याकडे या प्रकरणाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले. पण तो होऊ शकला नाही.