औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी संदीपान भुमरे?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 11:08 AM2020-01-02T11:08:38+5:302020-01-02T11:08:58+5:30
पालकमंत्रीपदाची जवाबदारी कुणाकडे जाणार अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकरणात सुरु आहे.
मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप आणि सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जवाबदारी कॅबिनेट मंत्री व शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांच्याकडे दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आज संध्याकाळपर्यंत खातेवाटपाचा जीआर निघण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातून शिवसेनेने लढवलेल्या सर्व 6 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकही उमेदवार जिल्ह्यातून निवडून आला नाही. त्यामुळे सहाजिकच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुद्धा शिवसेनेकडेचं असणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र पालकमंत्रीपदाची जवाबदारी कुणाकडे जाणार अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकरणात सुरु आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने जिल्ह्यात दोन मंत्रिपदे दिली आहेत. पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांची कॅबिनेट मंत्री तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली आहे. मात्र पालकमंत्रीपदाची जवाबदारी ही भुमरे यांच्याकडेच असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचं खातेवाटप आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणार असल्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तवली आहे. मंत्रालयात बुधवारी चार तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही महिती माध्यमांना दिली. सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांबाबत तिन्ही पक्षांत एकमत झालं असून खातेवाटपाचा निर्णयाच्या अंतिम स्वरूपापर्यंत तिन्ही पक्ष आले असून, आज यावर तोडगा निघणार असल्याचे सुद्धा पवार म्हणाले.