'लोकांसमोर एक अन् घरात दुसऱ्या भूमिकेचा 'दिखावा' मला पटत नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 10:53 AM2019-10-25T10:53:46+5:302019-10-25T10:55:51+5:30
आपल्या राजकीय सामर्थ्याच्या बळावर जिल्ह्यातून बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जागा राखली.
बीड - सलग दहा वर्षे लोकप्रतिनिधी राहिलेले जयदत्त क्षीरसागर यांची हॅटट्रिक पुतण्याने बाजी मारत रोखली. गुरुवारी अत्यंत चुरशीच्या सामन्यात संदीप क्षीरसागरने विजयश्री खेचून आणली. धनशक्तीपुढे जनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया संदीप यांनी दिली. तसेच, निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर झालेल्या पैसेवाटपामुळे माझं मताधिक्य कमी झालं, अन्यथा 20 हजारांच्या फरकाने मी जिंकलो असतो, असा विश्वासही संदीप यांनी बोलून दाखवला. आता, विजयानंतर संयमीपणे जनतेची कामे करण्याचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यापुढे आव्हान आहे.
आपल्या राजकीय सामर्थ्याच्या बळावर जिल्ह्यातून बीडमधूनजयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जागा राखली. परंतु, पक्षांतर्गत विरोध आणि झालेल्या कोंडीमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवबंधन बांधले. राजकीय अपरिहार्यता म्हणून क्षीरसागरांनी पक्ष बदलला तरी त्यांची भूमिका जनतेला पचनी पडली नसल्याचे या निकालावरुन दिसते. शहरी भाग नेहमीच जयदत्त क्षीरसागर यांच्या बाजुने राहिला, पण त्या भागातूनही यंदा जादा मताधिक्य मिळविता आले नाही. परिणामी दहा हजाराच्या फरकाने संदीप क्षीरसागर यांनी आघाडी घेतली.
संदीप यांनी आपल्या विजयाचे श्रेय कार्यकर्ते आणि तालुक्यातील जनतेला दिले आहे. नात्यांमधील भावनांपेक्षा लोकांच्या कामांना प्राधान्य हाच माझा निवडणूक लढविण्याचा उद्देश होता. घरातील वादांपेक्षा लोकांच्या अडचणी अग्रस्थानी ठेऊन आम्ही लढलो. माझ्या विजयात माझे कार्यकर्ते आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचा मोलाचा वाटा असल्याच संदीप यांनी सांगितलं. काकांबद्दल बोलताना, निवडणूक आल्यावरच काका मतदारसंघात येतात. मला वाटत नाही, यापुढे ते बीड मतदारसंघात येतील, असे वाटत नाही. लोकांची फसवणूक, कामांना येणारा अडथळा आणि विकासकामांना बसणारी खीळ यातूनच आमचं नेतृत्व पुढं आल्याचंही संदीप यांनी म्हटलं.
लोकांसमोर एक भूमिका दाखवायची आणि घरी दुसरी भूमिका हे मला पटत नाही. त्यामुळे मी निवडणूक काळातही काकांना भेटलो नाही. तसेच, निकालानंतरही माझी आणि त्यांची भेट झाली नाही. पण, मी सुडाचं राजकारण कधीही करत नाही. निवडणूक संपली, प्रचार संपला आता राजकारणही संपलं. आता, जनतेच्या आणि विकासाच्या कामाला सुरुवात करायचीय, असे म्हणत संदीप क्षीरसागर यांनी काकांबद्दल आपलं मत स्पष्ट केलं.