भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:27 AM2024-04-25T10:27:31+5:302024-04-25T10:28:16+5:30
Sandipan Bhumare: संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यास भाजपाचा विरोध होता. यामुळे औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवार जाहीर करण्यास अडचणी येत होत्या. अशातच भुमरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली होती. यामुळे विरोधक आक्रमक झाले होते.
महायुतीचे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मंत्री संदिपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यामध्ये त्यांनी पत्नीची संपत्ती लपविली होती. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करताच भुमरे यांनी दोन दिवसांत नवे प्रतिज्ञापत्र दिले आहे. यामध्ये त्यांनी पत्नीच्या नावावर दारु विक्रीचे दोन परवाने असल्याचे म्हटले आहे.
भुमरे यांनी पहिल्या अर्जामध्ये पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम असा दाखविला होता. परंतु पत्नीच्या नावावर दोन दारुचे परवाने होते. हे दानवेंना माहिती होते. यावर टीक करताच भुमरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे बुधवारी दुसरे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यात भुमरेंनी पत्नीचा व्यवसाय शेती आणि मद्यविक्री परवाने असल्याचे दाखविले आहे. आता भुमरे यांनी मद्य विक्री परवाने मुद्दामहून लपविले होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यास भाजपाचा विरोध होता. यामुळे औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवार जाहीर करण्यास अडचणी येत होत्या. यामुळे खूप विलंबाने उमेदवार जाहीर करण्यात आला. अशातच भुमरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली होती. यामुळे विरोधक आक्रमक झाले होते.
दारुचे परवाने असल्याने भुमरे यांच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता यामागे असू शकते. असा अंदाज वर्तवून ठाकरे गटाचे दानवे यांनी भुमरेंनी प्रतिज्ञापत्रात दारु दुकानांची माहिती का दडवली, असा सवाल उपस्थित केला होता. यामुळे भुमरे यांना हे मद्य दुकानांचे परवाने जाहीर करावे लागले आहेत.
दुसरीकडे यामुळे पत्नीचे उत्पन्नही भुमरे यांना जाहीर करावे लागले आहे. २०१९ मध्ये भुमरेंनी पत्नीचे उत्पन्न शून्य दाखविले होते. आता ते १४.८६ लाख दाखविण्यात आले आहे. २०१९ मध्ये भुमरेंची संपत्ती २ कोटी रुपये होती. आता ती ५.७० कोटी रुपयांवर गेली आहे.