वाळूतस्करांनी फेकली तहसीलदारावर मिरची पूड
By admin | Published: April 18, 2016 03:17 AM2016-04-18T03:17:32+5:302016-04-18T03:17:32+5:30
राज्यात वाळूतस्करांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली असून, रविवारी गेवराईत नायब तहसीलदाराच्या डोळ््यात वाळूतस्करांनी मिरची पूड फेकली; तर शनिवारी
बीड/इंदापूर : राज्यात वाळूतस्करांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली असून, रविवारी गेवराईत नायब तहसीलदाराच्या डोळ््यात वाळूतस्करांनी मिरची पूड फेकली; तर शनिवारी रात्री इंदापुरात महिला तहसीलदाराची गाडी अडवून कारवाईत अडथळा आणला.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे नायब तहसीलदार मधुकर मारोती गायकवाड हे तलाठी यू. आर. खिंडरे, आर. डी. सुपेकर, व्ही. बी. तपसे, कोतवाल कुदन काळे व एका पोलीस कर्मचाऱ्यासह रविवारी पहाटे संगम जळगाव येथील गोदावरी नदीपात्रात गेले होते. चार ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना वाळू भरली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना रोखले असता युवराज सुभाष नागरे याच्यासह जवळपास ३० जणांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर गायकवाड यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तीन ट्रॅक्टरसह वाळूतस्करांनी तेथून पळ काढला. गायकवाड यांनी २८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. एक ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, हे संशयित आरोपी फरार आहेत.
यापूर्वीही झाला होता हल्ला
गेवराई तालुक्यात वाळूतस्करांची मुजोरी वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी राजापूर येथे वाळू तस्करांनी मंडळ अधिकारी व तलाठ्यावर हल्ला केला होता. आता नायब तहसीलदारांना लक्ष्य केले.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास, बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईदरम्यान तहसीलदारांच्या गाडीसमोर वाहन आडवे लावून, शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून वरवंड (ता. दौंड, जि. पुणे) येथील वाळूव्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून बेकायदा वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास तहसीलदार वर्षा लांडगे यांना मिळाली. लांडगे यांनी याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांना दिली. पोलीस तसेच शासकीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार लांडगे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या एकेरी रस्त्यालगत थांबल्या. नऊच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरकडून पुण्याकडे निघालेले दोन वाळूचे ट्रक तहसीलदारांनी अडवले. चौकशीदरम्यान एक ट्रकचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. साडेनऊच्या सुमारास सोलापूरकडून आणखी एक ट्रक येताना दिसला. तो ट्रक अडवण्याचा प्रयत्न तहसीलदारांनी केला; मात्र तो न थांबताच निघून गेला. त्यामुळे तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ट्रकचा पाठलाग केला. पण एक गाडी आडवी आणून तहसीलदारांचे वाहन रोखण्यात आले. त्या गाडीतील संतोष दिवेकर व चंद्रकांत सातपुते या दोघांकडे विचारणा केली असता, ज्या ट्रकचा पाठलाग करीत आहात. तो आमचा आहे. आपण तो पकडू नये, म्हणून गाडी आडवी लावली, असे उत्तर त्यांनी दिले. शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार नोंदवून यो दोघांना ताब्यात घेण्यात आले.