सँडविच रबडी!

By admin | Published: May 27, 2017 06:13 AM2017-05-27T06:13:22+5:302017-05-27T06:13:22+5:30

राजकारणापलीकडचे नितीन गडकरी यांच्यावर चर्चा करायची असेल, तर त्यांच्या खवय्येगिरीला प्रथम स्थान द्यावे लागेल. गडकरी हे पट्टीचे खवय्ये आहेत.

Sandwich rabbi! | सँडविच रबडी!

सँडविच रबडी!

Next

राजकारणापलीकडचे नितीन गडकरी यांच्यावर चर्चा करायची असेल, तर त्यांच्या खवय्येगिरीला प्रथम स्थान द्यावे लागेल. गडकरी हे पट्टीचे खवय्ये आहेत. चटपटीत, गोड मेक्सिकन आणि थाई पदार्थ त्यांना जास्त आवडतात. तर्री पोह्याचे तर ते खास शौकीन आहेत. स्वत: तर खातातच, दुसऱ्यांना खाऊ घालण्यातही त्यांना विलक्षण आनंद मिळतो. त्यांच्या या खवय्येगिरीचे नागपुरात अनेक साक्षीदार आहेत. त्यातलेच एक जागतिक कीर्तीचे शेफ विष्णू मनोहर. ते सांगतात, गेल्या काही वर्षांपासून गडकरी आमच्या हॉटेलमध्ये आवर्जून येत असतात. खास किसमिस टाकून तयार केलेली पुडाची वडी त्यांना विशेष आवडते. मुलीच्या लग्नापूर्वी हॉटेलमध्ये आले, तेव्हा त्यांनी पुडाच्या वडीत किसमिस कमी असल्याची तक्रार केली होती. त्या वेळी ते अर्ध्या तासासाठी आले होते, पण तब्बल अडीच तास हॉटेलमध्ये बसले. एकदा त्यांनी मोबाइल करून खास तेलंगी आचाऱ्याच्या हाताने तयार केलेले पिठले आणि भाकरची आॅर्डर दिली होती. गोड पदार्थ त्यांना जास्त आवडतात. एकदा कुटुंबीयांसोबत आले . कांचन वहिनी त्यांना पुरणपोळी खाऊ देत नसल्यामुळे, त्यांनी मोठ्या बाउलमध्ये पुरणपोळीचे तुकडे करून व
त्यावर तूप टाकून आणण्यास सांगितले होते.
वहिनी साधे जेवण करतात. मुलीला कॉन्टिनेन्टल जेवण आवडते, पण गडकरी हे चौफेर खाणारे आहेत. ते थोडंच खातात, पण सर्वच पदार्थांवर ताव मारणे त्यांना आवडते. त्यांनी दिल्ली येथील बंगल्याच्या टेरेसवर स्वयंपाकघर तयार केले आहे. खास शेफने तयार केलेल्या पदार्थांवर ताव मारण्यासाठी पक्षातील नेत्यांपेक्षा विरोधी पक्षातील नेते जास्त येतात, असेही मनोहर म्हणाले. बंगारू लक्ष्मण भाजपाचे अध्यक्ष असताना, नागपुरात भाजपाचे अधिवेशन झाले होते. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी स्वत: खर्च करून मला ४ हजार कार्यकर्त्यांना जिलेबीचे जेवण देण्याची आॅर्डर दिली होती. त्यांच्या जन्मदिनी नेते आणि कार्यकर्त्यांना खास पक्वान्नांची मेजवानी राहील, ही माहितीही त्यांनी दिली.

हल्का-फुल्का नाश्ता म्हणजे सँडविच. ‘जीओ सँडविच’चा नाश्ता करण्यासाठी नितीन गडकरी खास नागपुरातील इतवारी, लाल इमली भागातील या तपस चक्रवर्ती यांच्या हातगाडीवर आवर्जून हजेरी लावतात. त्यांना बंगाली पद्धतीने तयार केलेले ‘सँडविच’ जास्त आवडते. तीन दिवसांपूर्वी गडकरी रात्री १० वाजता आल्याची आठवण तपस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. गेल्या १६ वर्षांपासून हातगाडीवर ‘सँडविच’ची विक्री करतो. १० वर्षांपूर्वी पहिल्यांदा आले, तेव्हा त्यांनी विशेष प्रकारच्या ‘सँडविच’ची मागणी केली होती. ते त्यांना खूप आवडले. त्यानंतर, वेळ मिळाला, तेव्हा मित्र आणि कुटुंबीयांसह येतात. गडकरी नागपुरात असले की, आॅर्डर देऊन खास मक्याचे ‘सँडविच’ मागवितात. आता मंत्री झाल्यामुळे महिना किंवा दोन महिन्यांतून एकदाच येतात. त्यांच्या कुटुंबीयांकडून एखाद्या कार्यक्रमाची आॅर्डर आली की, हातगाडी घेऊन वाड्यावर जातो. पाहुण्यांना ‘सँडविच’ आणि पिझ्झा तयार करून देतो. या वर्षी त्यांच्या जन्मदिनी हातगाडी घेऊन वाड्यांवर येण्याचे आमंत्रण मिळाले आहे. मी सकाळीच जाणार असून, पाहुण्यांना स्वादिष्ट ‘सँडविच’ तयार करून देणार आहे. चटपटीत पक्वान्न त्यांना जास्त आवडतात, असे तपस यांनी सांगितले.

विजयी होताच पोहोचले हॉटेलात
साधे जेवण आणि दुधापासून तयार केलेली गोड घट्ट रबडी नितीन गडकरी यांना जास्त आवडत असल्याची आठवण, नागपुरातील इतवारी शहीद चौक येथील जोशी भोजनालयाचे संचालक कमलकिशोर जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गडकरी ही रबडी खास आॅर्डर करून मागवितात. गेल्या १२० वर्षांपासून भोजनालय सुरू आहे. गडकरी भाजपाचे साधे कार्यकर्ते होते, तेव्हापासून हॉटेलमध्ये नियमित येतात. नागपूरचे खासदार म्हणून निवड झाल्यानंतर, त्या रात्री जेवण आणि ‘रबडी’ खाण्यासाठी भोजनालयात आले होते, पण त्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे तेव्हापासून आले नाहीत. त्यांना रबडी खायची असल्यास कुटुंबीय खास आॅर्डर देऊन मागवितात. ते कुठेही असले की, आमच्याकडील ‘रबडी’च्या चवीची आवर्जून आठवण काढतात, असे जोशी यांनी सांगितले.

Web Title: Sandwich rabbi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.