पिंजाळ नदीपात्रात वाळूउपसा सुरू
By admin | Published: October 17, 2016 03:07 AM2016-10-17T03:07:10+5:302016-10-17T03:07:10+5:30
पिंजाळ नदीवरील वाळूउपसा बंद करावा, यासाठी पीक व मलवाडा ग्रामस्थांनी मोहीमच हाती घेतली होती.
वाडा : तालुक्यातील पिंजाळ नदीवरील वाळूउपसा बंद करावा, यासाठी पीक व मलवाडा ग्रामस्थांनी मोहीमच हाती घेतली होती. त्याची दखल घेऊन पीक व मलवाडा गावातील हद्दीत रेतीउपसा केला जाणार नाही, यासाठी पीक ग्रामपंचायतीने ठरावदेखील मंजूर केला होता. मात्र, आता पुन्हा मलवाडा गावाच्या हद्दीत वाळूउपसा जोमाने सुरू झाला आहे.
याप्रकरणी गावकऱ्यांनी माहिती देऊनसुद्धा वाडा व विक्रमगड या दोन्ही महसूल विभागांतील अधिकारी कारवाईसाठी धजावत नाहीत, हे विशेष! पिंजाळ या बारमाही वाहणाऱ्या नदीवर पीक व मलवाडा गावाच्या हद्दीतून बेसुमार वाळूउपसा केला जात असून ज्यामुळे या नदीपात्राचे मोठे नुकसान होत असून येथील जलसंपदा संकटात आली आहे. या वाळू उपशाविरोधातील तक्रारींची दखल घेऊन पीक -शिलोत्तर ग्रुपग्रामपंचायतीने रेतीउपसा बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभेत ठराव घेतला होता. मात्र, या ठरावाला आता केराची टोपली दाखवतं पुन्हा वाळूतस्करांनी मलवाडा व पीक गावाच्या हद्दीत वाळूउपसा सुरू केला आहे. हद्द कुठलीही असली तरी याचा फटका मात्र जवळपास १ हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याला बसणार असल्याने तालुक्याच्या हद्दीचा विचार न करता प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
>दिवस-रात्र ट्रॅक्टरने उपसा
पिंजाळ नदीकाठी दिवसा अनेकदा महसूल विभागाच्या लक्षात आणूनसुद्धा कुठलीही कारवाई का झाली नाही? उलट, वाळूतस्कर दिवसा उपसा करून दिवसरात्र ट्रॅक्टर व ट्रकच्या साहाय्याने वाहतूक करतात, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. या प्रकाराची पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी गंभीर दखल घेऊन पिंजाळ नदी वाळूतस्करांच्या तावडीतंून पूर्णत: मुक्त न केल्यास येत्या काळात या विरोधात उपोषण केले जाईल व तसे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जाईल, असे ग्रामस्थ प्रवीण पाटील यांनी सांगितले.
>वाडा व मलवाडा या हद्दीच्या वादात अडकून आमच्या नदीचे पात्र उद्ध्वस्थ करणाऱ्या वाळूतस्करांना कुणीतरी लगाम घाला. एक हजार लोकांच्या आयुष्याचा प्रश्न असून गांभीर्याने ही नदी वाळूउपसामुक्त करा.
- प्रवीण पाटील, पीक ग्रामस्थ
>वाडा असो की विक्र मगड, आम्ही एकमेकांशी संवाद ठेवून या वाळूतस्करीवर एकत्रित कारवाई नक्कीच करू. मात्र, विक्र मगडमध्ये आम्ही कठोर भूमिका घेत असल्याने तस्कर अन्यमार्गे वाळूतस्करी करत असल्याचे आमच्या लक्षात आले आहे.
-सुरेश सोनावणे, तहसीलदार (विक्र मगड)