संगनमताने सव्वा लाखाचा अपहार
By admin | Published: June 10, 2016 01:13 AM2016-06-10T01:13:48+5:302016-06-10T01:13:48+5:30
माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी सरपंचपदावरून गेल्यानंतर देखील संगनमताने सव्वा लाखाचा अपहार करून फसविले आहे
यवत : डाळिंब ग्रामपंचायतीच्या बँकेतील खात्यातून माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी सरपंचपदावरून गेल्यानंतर देखील संगनमताने सव्वा लाखाचा अपहार करून फसविले आहे, अशी तक्रार विद्यमान सरपंच मंगल चंद्रकांत सुतार यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांची कसून चौकशी करून फसवणुकीचा व अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी मंगल सुतार यांनी केली आहे.
मंगल सुतार या डाळिंब ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर १६ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर ग्रामपंचायतीची मासिक सभा ७ जानेवारी २०१३ रोजी झाली. या सभेने सुतार यांना ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची बँकेतील खाती त्यांचे व ग्रामसेवक यांच्या सहीने चालविण्याचा अधिकार दिला. या ठरावाची प्रत तत्कालीन ग्रामसेवक एन. बी. लोंढे यांनी संबंधित बँकेला विहित मुदतीत न दिल्यामुळे यवत येथील अॅक्सिस बँकेच्या ग्रामपंचायतीच्या खात्यामधून १५ एप्रिल २०१३ रोजी राहुलदादा कुल स्वयंरोजगार संस्थेच्या नावाने १ लाख २० हजार ८२९ रुपयांचा धनादेश व याच दिवशी राजेंद्र रामचंद्र म्हस्के यांच्या नावे ३ हजार ९४२ रुपयांचा धनादेश तत्कालीन सरपंच धनंजय म्हस्के व ग्रामसेवक एन. बी. लोंढे यांच्या सहीने वटविण्यात आला. या बाबीमुळे अधिकार नसतानादेखील ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार संबंधित तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी सुरू ठेवल्याचे व अफरातफर केल्याचे निदर्शन येत आहे. तक्रारी अर्जात सुतार यांनी सविस्तर माहिती दिली असून, अधिकार गेल्यानंतरदेखील वटविलेल्या धनादेशाची प्रतदेखील जोडल्या आहेत. नवीन सरपंचांना सह्यांचे अधिकार देण्याच्या ठरावाला स्वत: तत्कालीन सरपंच धनंजय म्हस्के हेच सूचक आहेत. या ठरावाची प्रत त्या वेळचे ग्रामसेवक एन. बी. लोंढे यांनी तत्काळ ग्रामपंचायतीची खाती असलेल्या बँकांमध्ये देणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक त्यांनी टाळाटाळ केली. यामुळे संबंधित माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी संगनमताने हा प्रकार केला आहे.
मागास समाजातील आहात, गावात नीट राहा
महिला सरपंच असल्याने पाच वर्षे गावातील कामकाज चालविण्याची संधी मिळाली आहे. कमी शिक्षण असल्याने त्याचा आपण फायदा घेऊ आणि वाटेल ती चुकीची कामे करण्यास आपण भाग पाडू, अशी आशा गावातील काही चुकीच्या वृत्तीच्या राजकीय पुढाऱ्यांना
होती. त्यांच्याकडून कायम ग्रामपंचायतीमध्ये कामकाजात अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र चुकीची कामे करणार नाही असा ठाम निर्णय घेतल्याने त्यांची चांगलीच गोची झाली आणि त्यांनी कामकाजात अडचणी आणण्यास सुरुवात केली. आमचे ऐकले नाही तर इतर मागास समाजातील आहात, गावात नीट राहा, अशी धमकीवजा सूचना देण्यात आल्या. सरपंचपदावरून हटविण्याचा प्रयत्नदेखील त्यांनी केला. यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार नीट तपासले असता त्यांची चुकीची कामे झाकण्यासाठी असा प्रकार सुरू असल्याचे लक्षात आले. मात्र त्यांचे पितळ आता उघडे पडणार असून, लवकरच शासनदरबारी आपल्याला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया मंगल सुतार यांनी दिली.
दोन दिवसांत सविस्तर खुलासा देऊ...
माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यपद गेल्यानंतरदेखील ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार सुरू ठेवणे व धनादेश वटविले असल्याप्रकारणी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनंजय म्हस्के यांनी याबाबत दोन दिवसांत सविस्तर खुलासा देऊ, असा खुलासा ‘लोकमत’कडे दिला. तर याबाबत गटविकास अधिकारी संतोष हराळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़