भक्ती-शक्तीचे निसर्गरम्य स्थळ संगमेश्वर मंदिर
By Admin | Published: September 1, 2016 01:30 AM2016-09-01T01:30:12+5:302016-09-01T01:30:12+5:30
मंदिरास चहूबाजूंनी भक्कम संरक्षक भिंत, पूर्वमुखी भव्य प्रवेशद्वार, गाभाऱ्यात दगडी खांब, वर कोणाकृती दगडी बांधकाम, मंदिरापुढे वर्तुळाकार रंगशिला
के. डी. गव्हाणे-पाटील, लोणीकंद
मंदिरास चहूबाजूंनी भक्कम संरक्षक भिंत, पूर्वमुखी भव्य प्रवेशद्वार, गाभाऱ्यात दगडी खांब, वर कोणाकृती दगडी बांधकाम, मंदिरापुढे वर्तुळाकार रंगशिला, संगमेश्वराची शाळुंका आणि गणपतीची पाषाण मूर्ती, बाहेरील बाजूला भव्य नंदी, त्यावरील छत्री आणि सभोवताली भीमा, इंद्रायणी आणि भामा या नद्यांचा त्रिवेणी संगम या इतिहासाच्या खुणा मिरविणार हे देवस्थान संगमेश्वर मंदिर.
पुणे येथून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेले, निसर्गसृष्टीने नटलेले, भक्ती-शक्तीची भूमी श्रीक्षेत्र तुळापूर नावाने सर्वपरिचित आहे. दर शनिवार, रविवार व श्रावणी सोमवारी, मोठी गर्दी होते, तर महाशिवरात्रीला यात्रा भरते.
मंदिराची बाहेरील बाजूही सुंदर आहे. मंदिरापासून नदीच्या धारेपर्यंत जायला एक सुंदर दगडी घाट आहे. नंदीच्या किनाऱ्यावरील मंदिराचे प्रतिबिंब पाण्यात दिसते, तर कधी होडीने आनंदाने विहार पर्यटक दिसतात. ही दोन्ही दृश्ये मन प्रसन्न करणारी आहेत.
मंदिर कोणी बांधले, याचा पुरावा मिळत नाही. पण, १६३१मध्ये विजापूरच्या सुलतान अहमद आदिलशहा याने वजीर म्हणून या मुलखावर मुरार जगदेव पंडित या शूर सरदाराची नेमणूक केली. हे शहाजीराजांचे जवळचे मित्र होते व धार्मिक होते. पडझड झालेले मंदिर पाहून त्यांचे मन व्यथित झाले आणि त्यांनी या मंदिराचा पूर्वी होता अगदी तसा जीर्णोद्धार केला. मंदिराचा लौकिक वाढला. पुढे काळानुरूप पुन्हा ते जीर्ण झाले. १९९३मध्ये निरगुडकर फौंडेशनचे सुधीर निरगुडकर यांनी जुना ढाचा न बदलता आखीररेखीवपणा त्यात आणला. रंगरंगोटी, फूलझाडे, आखिवरेखीव रस्ते, सुंदर फुलांच्या कुंड्या, बहरलेली वनराई यांमुळे या स्थळाचा चेहरामोहरा बदलला. धार्मिक व ज्येष्ठ नागरिकांबरोबर परिसरातील युवक-युवती संगमेश्वराच्या दर्शनासाठी येऊन आनंद लुटत आहेत.
छत्रपती संभाजीमहाराज
धार्मिक स्थळाबरोबर येथील ऐतिहासिक स्थळ म्हणून ही महत्त्व आहे. छत्रपती संभाजीमहाराजांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर तुळापूर परिसरात आणण्यात आले. औरंगजेब आपल्या लवाजम्यासह येथे दाखल झाला. त्यांच्यासमोर महाराजांना हजर करण्यात आले. त्यांचे अनेक प्रकारे हाल करण्यात आले आणि अखेर वध करण्यात आला तीच ही भूमी आहे. या संदर्भामुळे येथे छत्रपती संभाजीराजांचे सुंदर मंदिर आहे. आतमध्ये अर्धपुतळा आहे. तसेच कवी कलश स्मृतिस्तंभ आणि औणि औरंगजेबाच्या तंबूच्या जागेवर घुमटासारखे छोटेसे बांधकाम आहे. या छोट्याशा गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहराजवळ एका दिवसाच्या सहलीचे हे सुंदर स्थळ आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गसौंदर्याने नटलेले एक गाव आहे.
ग्रामपंचायतीने या स्थळाकडे विशेष लक्ष दिले आहे. येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना सोयीसुविधा मिळाव्यात, याला प्राधान्य दिले आहे. भक्तनिवास, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत काँक्रिट रस्ते, स्वागत कमान आदी कामे पूर्ण झाली आहेत. तर, संरक्षक भिंतीचे काम चालू आहे. बागबगिचा व साफसफाईसाठी तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे, असे सरपंच रूपेश शिवले व उपसरपंच अमोल शिवले यांनी सांगितले.