संघ देश चालवत नाही - राजनाथ सिंह
By Admin | Published: September 6, 2015 12:44 AM2015-09-06T00:44:39+5:302015-09-06T00:44:39+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश चालवतो, हा आरोप बिनबुडाचा असून त्यात अजिबात तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: संघाचे स्वयंसेवक आहोत. कोणत्याही बैठकीत किंवा
मुंबई/पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश चालवतो, हा आरोप बिनबुडाचा असून त्यात अजिबात तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: संघाचे स्वयंसेवक आहोत. कोणत्याही बैठकीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमात आमच्याकडून गोपनीयतेच्या शपथेचा भंग होत नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली येथील समन्वय बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे १२ केंद्रीय मंत्र्यांनी हजेरी लावली. त्यावरून विरोधी पक्षांनी संघच देश चालवत असल्याची टीका केली.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले, मी स्वत: संघाच्या बैठकीस उपस्थित होतो. मंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या गोपनीयतेच्या शपथेचा या बैठकीत भंग झालेला नाही. तसेच कोणत्याही खासगी कार्यक्रमात या शपथेचा भंग होणार नाही याची आम्ही काळजी घेतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोसळत असूनही आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे, असा दावा करून राजनाथ सिंह म्हणाले, चीनची स्थिती काय झाली आहे ते आता जगाला समजले आहे, त्यामुळे त्यांची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे त्यांनी नमूद केले.
गुजरातमध्ये आंदोलन करण्यासाठी हार्दिक पटेल यांना संघाचाच पाठिंबा असल्याचा आरोप केला जातो, या प्रश्नाला उत्तर देणे राजनाथ यांनी टाळले तसेच दाऊदला पकडण्याबाबत वाट पाहावी, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
पाकच्या छुप्या कारवायांना तोंड देण्यास सैन्य सज्ज
पहिली गोळी आपल्याकडून जाणार नाही, मात्र समोरून गोळी आली तर नंतर आपल्या गोळ्या मोजायच्या नाहीत, असे स्पष्ट आदेश सीमेवरच्या सैनिकांना दिले आहेत. त्यामुळे पाक कितीही छुप्या कारवाया करीत असला तरीही त्याला तोंड देण्यास आपले सैन्य सज्ज आहे, असा राजनाथ सिंह म्हणाले.
मानव संसाधनामध्ये भारत दुसऱ्या कंमाकावर असतानाही विकसित देशांमध्ये भारताचा समावेश नाही. मात्र केंद्र शासनाकडून देशाच्या अर्थिक विकासासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे लवकरच भारतही विकसित देशाच्या पंगतीत बसेल.
मुंबई हल्ल्यात जिवंत पकडलेल्या कसाब आमच्या देशातील नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. मात्र नुकतच जम्मूमध्ये दोन जिवंत दहशतवादी पकडून आम्ही पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणला आहे. अमेरिकेने याबाबत पाकिस्तानला दहशतवादी कारवाया रोखण्याची ताकीद दिली आहे. मात्र आखाती देशांनी अद्यापही पाकिस्तानला अशा प्रकारे ताकिद दिलेली नाही. भारताकडे अमाप नैसर्गिक संपत्ती आहे. पण विकसित देशांमध्ये समावेश नाही. ज्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून हुकुमत चालवली तेच याला जवाबदार आहेत.