८९ वर्षांची परंपरा लाभलेला 'संघ'शिक्षा वर्ग - हेडगेवारांनी केली सुरुवात
By Admin | Published: May 18, 2016 07:25 PM2016-05-18T19:25:58+5:302016-05-18T19:25:58+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाबाबत सामान्यांमध्ये कुतूहल असते. परंतु याच प्रकारे प्राथमिक, प्रथम व द्वितीय असे संघाचे आणखी तीन वर्ग चालतात.
८९ वर्षांची परंपरा लाभलेला 'संघ'शिक्षा वर्ग - हेडगेवारांनी केली सुरुवात : सैन्यासारखे शिस्तबद्ध प्रशिक्षण देण्याचा होता उद्देश
योगेश पांडे
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाबाबत सामान्यांमध्ये कुतूहल असते. परंतु याच प्रकारे प्राथमिक, प्रथम व द्वितीय असे संघाचे आणखी तीन वर्ग चालतात. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर स्वयंसेवक घडावेत या दृष्टीने ८९ वर्षांअगोदर आद्य सरसंघचालक डॉ.केशव हेडगेवार यांनी या वर्गांची सुरुवात केली होती. स्वयंसेवकांना सैन्याप्रमाणे शिस्तबद्ध प्रशिक्षण मिळावे हा डॉ.हेडगेवार यांचा मुख्य उद्देश होता हे विशेष.
तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाला सोमवारपासून रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात झाली. अगदी उच्चविद्याविभुषितांपासून ते विद्यार्थीजीवनात असलेले स्वयंसेवक यात सहभागी झाले आहे. परंतु या संघशिक्षा वर्गांचा नेमका इतिहास फार कमी जणांना माहिती आहे.
१९२५ साली ज्यावेळी संघाची स्थापना झाली तेव्हा डॉ.हेडगेवार स्वयंसेवकांना सैन्य प्रशिक्षण देऊ इच्छित होते. यामुळे स्वयंसेवकांमध्ये शिस्त आणि समूह भावना वाढीस लागते हा त्यामागचा विचार होता. डॉ. हेडगेवारांना सैन्य प्रशिक्षणाबाबत फार माहिती नसल्यामुळे त्यांनी काही माजी सैनिकांना रविवारच्या ह्यपरेडह्णमध्ये बोलविण्यास सुरुवात केली. परंतु संघ विस्तारासाठी आठवड्यातील काही तास प्रशिक्षण पुरेसे नाही असे डॉ.हेडगेवारांना वाटले व जून १९२७ पासून मोहिते वाड्याच्या मैदानात ४० दिवसीय प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. यात १७ स्वयंसेवक सहभागी झाले होते व सैन्य प्रशिक्षणासोबतच बौद्धिक कार्यक्रमांचादेखील समावेश होता. यातूनच १९२९ सालापासून नियमित संघ शिक्षा वर्गांची सुरुवात झाली. अगोदर यांना ह्यओटीसीह्ण (आॅफिसर्स ट्रेनिंग कॅम्प) असे म्हटले जायचे. १९३४ पर्यंत संघशिक्षा वर्ग नागपुरातच व्हायचे. १९३५ साली प्रथम व द्वितीय वर्ष शिक्षा वर्गाचे प्रथमच नागपूरबाहेर आयोजन करण्यात आले. पुण्यात हे आयोजन झाले होते.
पाचवेळा तृतीय वर्ष वर्गात अडथळे
संघाची स्थापना होऊन ९१ वर्ष झाले आहेत. परंतु तृतीय वर्ष वर्ग प्रत्येकच वर्षी झाला असे नाही. इतिहासात पाच वेळा विविध कारणांमुळे हा वर्गच होऊ शकला नाही. १९४८, १९४९ मध्ये संघावर बंदी लावण्यात आली होती. तर आणिबाणीच्या काळात म्हणजेच १९७५ आणि १९७६ मध्ये तृतीय वर्ष शिक्षा वर्ग झाला नव्हता. डिसेंबर १९९२ मध्ये राममंदिर आंदोलनानंतर संघावर बंदी लावण्यात आली होती व १९९३ मध्येदेखील हा वर्ग होऊ शकला नव्हता. तृतीय वर्ष वर्ग नागपुरातच
संघाचे प्रथम वर्षाचे शिक्षावर्ग प्रांतनिहाय, द्वितीय वर्षाचे क्षेत्रनिहाय आणि तृतीय वर्षाचे वर्ग राष्ट्रीय स्तरावरील असतात. तृतीय वर्षाचा वर्ग हा केवळ नागपुरातच होतो. तृतीय वर्ष शिक्षा वर्ग अगोदर ४० दिवसांचा होता. त्यानंतर तो ३० दिवसांचा झाला व आता त्याचा कालावधी २५ दिवसांचा झाला आहे. तर प्रथम व द्वितीय वर्ष वर्ग २० दिवसांचे असतात. काही काळासाठी हे वर्ग अनुक्रमे १५ व २५ दिवसांचे करण्याचा प्रयोगदेखील झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशिक्षण वर्ग वर्षभर आयोजित होत असतात. परंतु उन्हाळ््याच्या सुट्ट्यांमध्ये जास्तीत जास्त वर्ग घेण्यावर भर असतो
वर्षभरात ९६१ प्राथमिक वर्ग
संघाच्या प्राथमिक शिक्षा वर्गाचा कालावधी एक आठवड्यांचा असतो. २०१५-१६ मध्ये देशभरात ९६१ प्राथमिक शिक्षा वर्ग झाले व यात १ लाख १३ हजार ५२० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या वर्गात सहभाग घेतल्यानंतरच स्वयंसेवक २० दिवसांच्या संघशिक्षा वर्गात येऊ शकतात. २०१५-१६ मध्ये देशभरात ८३ संघशिक्षा वर्ग झाले. यात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष शिक्षावर्गांचा समावेश आहे, अशी माहिती विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अतुल पिंगळे यांनी दिली.