सांगलीत कृषी प्रदर्शनाचा मंडप कोसळला
By admin | Published: January 17, 2015 12:05 AM2015-01-17T00:05:11+5:302015-01-17T00:06:48+5:30
आंबेडकर क्रीडांगणातील घटना : पंधराजण जखमी; संयोजकांसह दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सांगली : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर भरविण्यात आलेल्या कृषी व पशु प्रदर्शनाचा मंडप कोसळल्याने प्रदर्शन पाहण्यास आलेले १५ लोक जखमी झाले. आज, शुक्रवारी सकाळी अकराला ही घटना घडली. याप्रकरणी प्रदर्शनाचे संयोजन राजेश शहा (रा. इंद्रप्रस्थनगर) व मंडप व्यावसायिक सुनील माळी (कलानगर, सांगली) यांच्याविरुद्ध दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमींमध्ये सुभान इकबाल पटेल (वय २२, रा. पद्माळे), श्रीपाल गोपाळराव आचार्य (५०, रा, माधवनगर, ता. मिरज), अजिंक्य प्रकाश पवार (२२, सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्यासह अन्यजणांचा समावेश आहे. जखमींवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर प्रदर्शनात प्रचंड गोंधळ आणि आरडाओरड सुरु झाली होती. घटनास्थळी शासकीय व खासगी रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. मदतकार्यासाठी पोलिसांचाही फौजफाटा मोठ्या प्रमाणात दाखल झाला होता. जखमी श्रीपाल आचार्य यांची फिर्याद घेऊन पोलिसांनी शहा व माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‘रिसोर्सेस’तर्फे दि. १५ ते १८ जानेवारीदरम्यान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात तीन मोठे मंडप उभे केले आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रदर्शन सुरु होते. त्यावेळी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रवेश करण्यात येणाऱ्या स्टॉलचा मंडप अचानक कोसळला. स्टॉलमध्ये वाहने असल्याने मंडपाचा पत्रा, काठ्या व लोखंडी अँगल त्यावर पडले. स्टॉलमध्ये पन्नासहून अधिक लोक होते. त्यांच्या अंगावरही पत्रे पडले. एका जखमीच्या खांद्यात पत्रा घुसला आहे. घटनास्थळी तातडीने मदत मिळाल्याने अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश आले. (प्रतिनिधी)
पावसाची शक्यता असल्याने पत्र्याचा मंडप उभारण्यात आला होता. वाऱ्यामुळे हा मंडप कलून पाच फूट खाली आला. यामुळे २० ते २५ स्टॉलधारकांना याचा फटका बसला. यामध्ये तिघे जखमी झाले. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले आहेत. आता याठिकाणी कापडी मंडपाची उभारणी केली आहे.
- राजेश शहा
संयोजक, कृषी प्रदर्शन
जिल्हा परिषदेची शहांना नोटीस
राजेश शहा यांनी कृषी प्रदर्शनात जिल्हा परिषद सांगली असा उल्लेख केला असून हा कायदेशीर गुन्हा आहे. याप्रकरणी तुमच्यावर फौजदारी कारवाई का करू नये, अशी नोटीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राजेश शहा यांना पाठविली आहे. नोटिसीला उत्तर आल्यानंतर शहा यांच्यावर पुढील कारवाई होणार असल्याचेही सतीश लोखंडे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण भाड्याने न देण्याबाबत मनपाने ठराव केला असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता आयुक्त अजिज कारचे यांनी, घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेण्यात येईल व त्यानंतरच निर्णय घेणार असून भविष्यात प्रदर्शन भरविण्यासाठी मोकळ्या जागेची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.