सांगलीला मंत्रीपदाचे आणखी एक स्वप्न
By admin | Published: January 1, 2015 11:14 PM2015-01-01T23:14:14+5:302015-01-02T00:20:34+5:30
आमदारांना आशा : एका पदासाठी चौघांची दावेदारी; समर्थक जोशात
सांगली : मुंबईवाऱ्या, चर्चेच्या फेऱ्या आणि नेत्यांना साकडे घालूनही मंत्रीपदापासून वंचित राहिलेल्या सांगली जिल्ह्याला सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक स्वप्न दाखविले. मंत्रीपदाचे हे स्वप्न आहे की गाजर, याची पुरेशी खात्री अजूनही झाली नसली तरी, जिल्ह्यातील चारही आमदार समर्थकांची दावेदारी पुन्हा सुरू झाली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात नेहमीच सांगलीचा दबदबा राहिला आहे. आजवरची ही परंपरा नव्या भाजप सरकारने खंडित केल्यामुळे भाजपमध्ये सध्या नाराजी दिसत आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यास खिंडार पाडून तब्बल ५0 टक्के जागांवर भाजपचा झेंडा फडकविणाऱ्या भाजप आमदारांना मंत्रिमंडळापासून मात्र दूर ठेवण्यात आले आहे. आजवर दोन शपथविधी पार पडले. पहिल्याच शपथविधीत सांगलीला एक तरी मंत्रीपद मिळणारच, अशी खात्री जिल्ह्यातील भाजप नेत्यांना होती. त्यासाठी चारही आमदार, खासदार आणि प्रमुख नेते मुंबईत ठाण मांडून होते. पण मुख्यमंत्र्यांसह झालेल्या पहिल्या शपथविधीत त्यांचे स्वप्न भंगले. दुसऱ्या शपथविधीला तरी हमखास मंत्रीपद मिळणारच, या आशेने पुन्हा ‘फिल्डिंग’ लावण्यात आली. खासदार संजय पाटील यांच्यासहीत मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांनी स्वतंत्रपणे नेत्यांकडे ताकद लावली. त्यासाठी चर्चेच्या फेऱ्या झाल्या. प्रदेशाध्यक्षांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच सांगलीच्या आमदारांना ‘सलाईन’वर ठेवले. अनेकदा मंत्रीपदाचे गाजर दाखविले. त्यामुळे दुसऱ्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण या शपथविधीतही सांगलीच्या पदरात काहीही पडले नाही. इच्छुक आमदारांसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी लपवित मंत्रीपद मिळण्याची आशा सोडून दिली. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्तीही झाली. उसना पालकमंत्री मिळूनही भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. या स्वागतामागे दडलेली नाराजी चंद्रकांत पाटील यांनी ओळखली होती. म्हणूनच त्यांनी मी प्रभारी पालकमंत्री असल्याचे सांगून निराश झालेल्यांना पुन्हा नवे स्वप्न दाखविले.
लवकरच राज्यात १२ मंत्र्यांचा शपथविधी होणार असून त्यात भाजपच्या वाट्याला ६ आणि मित्रपक्षांच्या वाट्याला ६ मंत्रीपदे मिळणार असल्याचे सांगतानाच, यातील एक मंत्रीपद सांगलीला निश्चित मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे औपचारिक स्वागताची जागा उत्साहाने घेतली. कार्यकर्त्यांसह आमदारांच्या समर्थकांत पुन्हा मंत्रीपदाचे स्वप्न फुलले. आता हे स्वप्न आहे की गाजर, अशी शंकाही काही बेरक्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केली आहे.
मंत्रीपदाची आशा जिल्ह्यातील भाजपच्या चारही आमदारांना आहे. शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, विलासराव जगताप आणि सुधीर गाडगीळ या चारही आमदारांच्या समर्थकांची आता पुन्हा दावेदारी सुरू केली आहे. खरोखर बारा मंत्र्यांचा शपथविधी होणार का? तो कधी होणार आहे? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. (प्रतिनिधी)....
कॅबिनेटपासून राज्यमंत्रीपदापर्यंत
सांगलीला किमान दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार, अशी मोठी स्वप्ने विधानसभेनंतर रंगविली गेली. आघाडी सरकारच्या कालावधित तीन कॅबिनेट मंत्रीपदे जिल्ह्याला होती. त्यामुळे या मोठ्या स्वप्नाबद्दल फारसे कोणाला आश्चर्य वाटले नाही. पहिला शपथविधी पार पाडल्यानंतर किमान दोन मंत्रीपदे तरी मिळतील, असे भाजपचे नेते सांगू लागले. दुसऱ्या शपथविधीवेळी एकतरी नक्कीच खाते मिळणार असा दावा केला जाऊ लागला. दुसऱ्या शपथविधीनंतर दावेदारीच बंद झाली. चंद्रकांत पाटील यांच्या आशावादानंतर आता राज्यमंत्रीपद तरी मिळू दे, म्हणून भाजपचे नेते देवाला साकडे घालू लागले आहेत, अशी चर्चा आहे.