सांगली: मोहरमचा दिमाखदार सोहळा; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश , कडेगावात गगनचुंबी ताबूत भेटी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 06:05 PM2017-10-01T18:05:54+5:302017-10-01T18:06:19+5:30
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात पार पडला.
कडेगाव (सांगली) : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात पार पडला. ‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा , अब एकीका कर दो पुकारा’ ‘हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे’ या ऐक्याच्या संदेशाने परिसर दुमदुमून गेला.या हुसेन दुला,या इमामो दुला अशा गजरात मोहरमनिमित्त येथे १२५ ते १५० फूट उंचीच्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटी पाटील चौक येथे संपन्न झाल्या.
हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते. विशेषतः सांगली , सातारा, कोल्हापूर, सोलापूर ,पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती . सकाळी नऊ वाजता शिवाजीनगर, निमसोड, सोहोली, कडेपूर ,नेर्ली आदी गावातील मानकऱ्यांना वाजत-गाजत ताबूताच्या ठिकाणी आणण्यात आले. त्यानंतर पूजा करून मानाचा सातभाई यांचा उंच ताबूत सकाळी ११.४५ वाजता उचलण्यात आला. येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला.हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात बाराच्यादरम्यान आणण्यात आले. त्यानंतर बागवान यांचा उंच, आत्तार, शेटे यांचे ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर सातभाई पाटील, सातभाई बागवान, सातभाई आत्तार ,सातभाई हकीम,या उंच ताबूतांच्या भेटी दुपारी सव्वाबाराला झाल्या .
त्यानंतर हिंदू मानकऱ्यांमार्फत मसूदमाला ताबूत व पंजे, बारा इमामचे पंजे, नालसाहेब यांचे पंजे ,तांबोळी ,इनामदार व सुतार यांचे ताबूत आणले गेले. सर्व ताबूत माना प्रमाणे एकत्रित केले गेले. त्यानंतर दुपारी दीडला ताबूत उचलण्यात आले व मुख्य भेटीचा सोहळा सुरू झाला.डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या नेत्रदीपक सोहळ्यात गगनचुंबी ताबूत पाहून भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते . या ठिकाणी मानाप्रमाणे सर्व ताबूतांच्या भेटी झाल्या.
यावेळी माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, खासदार संजय पाटील,कऱ्हाडचे आ. बाळासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख ,सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष आ .मोहनराव कदम,जिल्हाधिकारी विजय काळम पाटील, डॉ. जितेश कदम, भाऊसाहेब यादव ,कडेगावचे सर्व नगरसेवक ग्रामस्थ आदी उपस्थित होते .