सांगली जिल्ह्यास एक मंत्रिपद मिळणार

By admin | Published: January 15, 2016 11:08 PM2016-01-15T23:08:17+5:302016-01-16T00:31:29+5:30

विनोद तावडे : ‘सिव्हिल’च्या नवीन ‘ओपीडी’ बांधकामाचे भूमिपूजन; निधी कमी पडू देणार नाही

Sangli district will get one minister | सांगली जिल्ह्यास एक मंत्रिपद मिळणार

सांगली जिल्ह्यास एक मंत्रिपद मिळणार

Next

सांगली : वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) नवीन ओपीडी बांधण्यासाठी मंजूर केलेला निधी तीन वर्षे पडून राहिला. जिल्ह्यात जयंत पाटील, पतंगराव कदम व आर. आर. पाटील यांच्यासारखे तीन-तीन मातब्बर मंत्री असतानाही हे काम झाले नाही. सरकार आमचे आल्यानंतर जिल्ह्याला एकही मंत्रिपद नसतानाही ओपीडीच्या बांधकामास सुरुवात केली. त्यामुळे आता एकतरी मंत्रिपद दिले पाहिजे. जेणेकरून या कामाला गती मिळेल, असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. ‘सिव्हिल’च्या विस्तारित इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन तावडे यांच्याहस्ते शुक्रवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यास लवकरच एक मंत्रिपद मिळेल. या व्यासपीठावर बसलेल्या सेना-भाजप आमदारांपैकीच एकाला ‘लॉटरी’ लागेल. त्यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, आमच्यापैकी कोणालाही संधी द्यावी, आम्ही त्याला सर्वतोपरी मदत करू, असे सांगितले आहे. गोरगरीब रुग्णांना सेवा देणाऱ्या या रुग्णालयाचा पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व कर्नाटकात नावलौकिक आहे. कित्येक वर्षे मंत्री म्हणून काम केलेल्या जयंतराव, पतंगराव व आबा यांच्या काळातच रुग्णालयाचे विस्तारिकरण होणे अपेक्षित होते. विस्तारिकरणासाठी निधी मंजूर करुनही त्याचा त्यांना उपयोग करता आला नाही. कोट्यवधीचा निधी तीन वर्षे पडून राहिला. काही महाभागांनी हा निधी परत पाठविण्याचाही प्रयत्न सुरू ठेवला होता, पण सेना- भाजपच्या जिल्ह्यातील आमदारांनी वेळीच आवाज उठवल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.ते म्हणाले की, शासकीय रुग्णालय पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागास जोडले होते. त्यावेळी काही चांगले डॉक्टर सेवेत होते. आता पुन्हा या डॉक्टरांना सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे रुग्णांना आणखी चांगल्याप्रकारे सेवा देता येईल. रुग्णालयाची अजूनही वीस एकर जागा पडून आहे. सांगलीतही एखादे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी का केली जात नाही? मध्य प्रदेश राज्याप्रमाणे येथेही खासगी मदतीवर वैद्यकीय महाविद्यालय होऊ शकते. येथे शासकीय कर्करोग रुग्णालय उभे करण्याचा विचार सुरू आहे. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरली जातील. आ. सुधीर गाडगीळ म्हणाले की, वसंतदादा पाटील यांच्या नावाचे हे सर्वात जुने रुग्णालय आहे. दादांच्या नावाला काळीमा लागणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे. यासाठी रुग्णालय सर्व सोयींनी सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न राहिल.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे म्हणाले की, ओपीडीच्या बांधकामास लागणाऱ्या निधीची काळजी करु नका. बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. निधी कशाप्रकारे उपलब्ध करता येईल, याचे नियोजन केले जाईल.
अधिष्ठाता डॉ. नरसिंह हेरेकर यांनी प्रास्ताविक केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. डी. शेजाळ यांनी, ओपीडी इमारत कशी होणार आहे याची माहिती दिली.
यावेळी आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश खाडे, आ. अनिल बाबर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष माजी आ. पृथ्वीराज देशमुख, प्रा. शरद पाटील, नितीन शिंदे, दिनकर पाटील, गोपीचंद पडळकर, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, राजाराम गरुड, मुन्ना कुरणे उपस्थित होते.
विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भागवत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


सुसज्ज रुग्णवाहिका देणार : संजयकाका पाटील
खा. संजयकाका पाटील म्हणाले की, खासदार फंडातून रुग्णालयास सुसज्ज रुग्णवाहिका दिली जाईल. तावडेसाहेबांनी ओपीडीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले आहे. त्यामुळे उद्घाटनासही त्यांनीच यावे. जीवनदायी योजनेचा खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून दुरुपयोग सुरू आहे. त्यामुळे गरीब रुग्ण योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. शासनाने यामध्ये हस्तक्षेप करुन योजनेच्या नियमावलीत बदल करण्याची गरज आहे. योजनेच्या नावाखाली भानगडी करणाऱ्या खासगी डॉक्टरांची चौकशी करावी.


अन् तावडे व्यासपीठावरून उतरले!
तावडेंचे भाषण संपत आले होते. ‘मी कोठेही कार्यक्रमास जाऊ दे, बोलतो कमी आणि लोकांच्या तक्रारी, अडचणी जाणून घेण्यास प्राधान्य देतो’, असे म्हणतच त्यांनी व्यासपीठावरील माईक सोडला आणि उपस्थितांना प्रश्न विचारण्याची विनंती केली. उपस्थितांनीही त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. परिचारिका, सामान्य लोक व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना प्रश्न विचारले. दफ्तराचे ओझे कमी करण्यापासून ते प्रशिक्षणार्थी परिचारिकांना मानधन वाढविण्यापर्यंत प्रश्न विचारण्यात आले. काही वेळाने प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात रंगत आल्याने तावडे व्यासपीठ सोडून थेट उपस्थितांमध्ये सहभागी झाले.

Web Title: Sangli district will get one minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.