सांगलीत शेतक-यांना पोलिसांकडून मारहाण, जबरदस्तीने व्हॅनमध्ये कोंबले
By admin | Published: June 7, 2017 01:18 PM2017-06-07T13:18:31+5:302017-06-07T13:19:06+5:30
शेतक-यांच्या संपादरम्यान आज सकाळी स्थानबद्ध केलेल्या कार्यकर्त्यांना बाहेरगावी हलविताना पोलिसांनी बळाचा वापर केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 07 - शेतक-यांच्या संपादरम्यान आज सकाळी स्थानबद्ध केलेल्या कार्यकर्त्यांना बाहेरगावी हलविताना पोलिसांनी बळाचा वापर केला. आठ कार्यकर्त्यांना जबरदस्तीने पोलिसांच्या व्हॅनमध्ये कोंबले. त्यांना व्हॅनमध्ये मारहाण झाली. यात किसान सभेच्या उमेश देशमुख यांच्या बोटाला दुखापत झाली.
सांगलीत शेतक-यांच्या संपादरम्यान सर्वपक्षीय कार्यकर्ते सकाळी भाजीमंडईत बाजार बंद करण्यास जाणार होते. मात्र पोलिसांनी तत्पूर्वीच सकाळी सहाच्यादरम्यान त्यांना ताब्यात घेतले. सर्व कार्यकर्त्यांना विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणण्यात आले. हे समजताच पोलीस ठाण्यात आणखी कार्यकर्ते जमा झाले. दुपारी बारा वाजताच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे, किसान सभेचे कॉ. उमेश देशमुख, हमाल पंचायतीचे विकास मगदूम, जनता दलाचे शशिकांत गायकवाड, अश्रफ वांकर यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी बाहेरगावी हलविण्याचे ठरविले. मात्र कार्यकर्त्यांनी विरोध करताच पोलिसांनी बळाचा वापर केला.
पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्यासह पोलिसांनी आठ आंदोलकांना ओढत नेऊन पोलिसांच्या व्हॅनमध्ये कोंबले. शिवाय व्हॅनमध्ये मारहाण झाली. यात किसान सभेच्या उमेश देशमुख यांच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर सर्वांना तासगाव पोलिस ठाण्याकडे रवाना करण्यात आले. हे वृत्त समजताच वकिलांसह विविध संघटनांच्या कार्यर्त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.