सांगली, जळगावात कमळ; दोन्हीकडे सत्ताधारी पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 05:55 AM2018-08-04T05:55:05+5:302018-08-04T05:55:05+5:30
राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली व जळगाव या महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता काबीज केली आहे.
सांगली/जळगाव : राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली व जळगाव या महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता काबीज केली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी असलेल्या सांगलीत सत्ताधारी कॉँग्रेस व राष्टÑवादी आघाडीचा धक्कादायक पराभव करताना भाजपाने ६ वरून ४१ जागांवर मुसंडी मारली. आघाडीला ३५ जागांपर्यंतच मजल मारता आली, तर जळगावमध्ये शिवसेनेला चारीमुंड्या चित करून, भाजपाने ७५ पैकी ५७ जागा पटकावत सत्तांतर घडविले. राष्टÑवादी, काँग्रेस व समाजवादी पक्षाला तिथे भोपळाही फोडता आला नाही.
सांगलीत कोणत्याही प्रकारची टीका टाळून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली आणि लोकांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला निवडून दिले, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. सुरेशदादा जैन म्हणाले, जळगावकरांनी दिलेला कौल मान्य आहे. भाजपाने रस्ते, गाळे प्रश्न, हुडको कर्जाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. २०० कोटींचा निधी आणून शहराचा वर्षभरात विकास करू, असाही शब्द दिला आहे. या आश्वासनांची पूर्तता करुन जळगावकरांना न्याय द्यावा. आमचे विकासाला सहकार्य तर चुकीच्या गोष्टींना विरोध असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जळगावमध्ये पहिल्यांदाच बहुमत
२००३ मध्ये स्थापन झालेल्या जळगाव महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. मात्र, या निवडणुकीत भाजपाने विरोधकांना भुईसपाट केले.
‘एमआयएम’चा पहिल्यांदाच प्रवेश
एमआयएमने तीन जागांवर विजय मिळवित चमत्कार घडविला. प्रभाग १८ मधील तीनही जागा त्यांनी जिंकल्या.
भाजपात गेलेले १६ उमेदवार विजयी
ऐन निवडणुकीच्या तोंडावर १८ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यापैकी काही नगरसेवक व त्यांचे नातेवाईक अशा १६ जणांना भाजपाने उमेदवारी दिली होती. ते विजयी झाले. त्यात मावळते महापौर ललित कोल्हे, माजी महापौर सदाशिव ढेकळे, माजी नगराध्यक्षा सिंधुताई कोल्हे, माजी उपमहापौर भारती सोनवणे, राष्टÑवादीचे गटनेते सुरेश सोनवणे यांचा विजय झाला. अन्य पक्षांतून शिवसेनेत गेलेले तिघे उमेदवार पराभूत झाले.
सांगलीत काँग्रेसचे किशोर जामदार, भाजपाचे विवेक कांबळे, राष्ट्रवादीचे इद्रिस नायकवडी या तीन माजी महापौरांना पराभवाचा धक्का बसला. विद्यमान महापौर हारुण शिकलगार व माजी महापौर कांचन कांबळे यांनी विजय मिळविला.
काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठी फौज
सांगलीत राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. विश्वजित कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई मदन पाटील यांनी आघाडीच्या बाजूने, तर महसूलमंत्री चंद्र्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे यांनी भाजपाकडून प्रतिष्ठा पणाला लावली होती.
संजयकाका पाटील यांना धक्का
प्रभाग पंधराचा निकाल धक्कादायक लागला. १५ दिवस तळ ठोकूनही भाजपा खासदार संजयकाका पाटील हे त्यांचा मामेभाऊ आणि मामेभावाच्या पत्नीचा पराभव टाळू शकले नाहीत!
गेल्या १५ वर्षांत विकास कामेच झाली नव्हती. त्यामुळे जनता सत्ताधाऱ्यांवर नाराज होती. आश्वासनानुसार वर्षभरात भरीव विकास कामे करुन मतदारांचा विश्वास सार्थ ठरवणार आहे.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री
जनतेच्या मनात काय आहे, हा कौल त्यांनी स्पष्टपणे या निकालातून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या विकास आणि विश्वासाच्या राजकारणाला राज्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी पसंती दिली आहे. राज्यात विविध समाजांचे, विकासाचे, आरक्षणाचे, रोजगाराचे प्रश्न आहेत. ते सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न सरकार करतेच आहे. या जनादेशाने आम्हाला भक्कम पाठबळ दिले आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
दोन्ही ठिकाणी जनतेने भाजपावर विश्वास दाखवला. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे व कार्यकर्त्यांच्या कष्टाचे यश आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
जळगाव । एकूण : ७५
पक्ष २०१३ २०१८
भाजपा १५ ५७
खाविआ/
शिवसेना ३३ १५
एमआयएम ०० ०३
मनसे १२ ००
राष्टÑवादी ११ ००
काँग्रेस ०० ००
मविआ ०१ ००
इतर ०३ ००
सांगली । एकूण : ७८
पक्ष २०१३ २०१८
भाजपा ०६ ४१
काँग्रेस ४१ २०
राष्ट्रवादी १९ १५
शिवसेना ०० ००
स्वाभिमानी ०२ ०१
मनसे ०१ ००
अपक्ष ०९ ०१
सांगलीत ४६ नवे चेहरे; २४ नगरसेवकांसह
८ माजी नगरसेवक विजयी