सांगली:शेतकरी संपाला पाठिंब्यासाठी वकिलांचं उद्या कामबंद आंदोलन
By Admin | Published: June 7, 2017 07:51 PM2017-06-07T19:51:40+5:302017-06-07T19:51:40+5:30
शेतकरी प्रश्नावरून सुरु झालेला लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील वकिलांनीही आता शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 7 - शेतकरी प्रश्नावरून सुरु झालेला लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील वकिलांनीही आता शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे. शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील वकील उद्या एक दिवस "कामकाजापासून अलिप्त आंदोलन" करणार आहेत.
शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी आणि आज आदोलकांना सोडवण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी गेलेल्या वकिलांना मारहाण आणि बेकायदेशीरपणे अटक झाली. परिणामी वकिलांना मारहाण आणि बेकायदेशीरपणे अटक केल्याबद्दल उद्या वकील कामापासून अलिप्त राहणार आहेत. उद्या सकाळी 11.30 वाजता वकील निषेध फेरी काढणार आहेत. वकील संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र हिंगमिरे यांनी याबाबत माहिती दिली.
कर्जमाफीसंदर्भातील मुद्यावर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ऑक्टोंबरपर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असे, त्यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी ही कर्जमाफी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असा विश्वासही व्यक्त केला. फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर शेतकरी संपासंदर्भातील भूमिका बदलतील का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शेतकऱ्यांनी अद्यापही आपली भूमिका ठाम ठेवल्याचे दिसते. कर्जमाफीवर ठोस आणि लवकरात लवकर निर्णय घेतला जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात शेतकरी सरकारविरोधात आंदोलन करत आहेत.