सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 08:34 AM2024-05-03T08:34:31+5:302024-05-03T08:35:13+5:30

Sangli Loksabha Election - सांगलीच्या सभेत राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना इशारा देत उद्धव ठाकरेंचं कौतुक केले. त्याशिवाय चंद्रहार पाटलांच्या विजयासाठी प्रचाराला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. 

Sangli Lok Sabha Constituency - NCP Sharad Pawar group leader Jayant Patil praised Uddhav Thackeray | सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले

सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले

सांगली - Jayant Patil on Uddhav Thackeray ( Marathi News ) हा मतदारसंघ काँग्रेसनं शिवसेनेला का दिला, असा प्रश्न मी विचारू शकतो, पण विचारला नाही. हा काँग्रेस-शिवसेनेतील चर्चेचा भाग. पण उद्धव ठाकरेंचा स्वभाव पाहता सूर्य एक वेळ पश्चिमेला उगवेल मात्र ते निर्णय बदलत नाहीत असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

सांगली इथं मविआ उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. जयंत पाटील यावेळी म्हणाले की, सांगलीची जागा काँग्रेसनं शिवसेनेला का दिली, हा प्रश्न मी करू शकतो, पण मी नाही केला. ही तुमच्या दोघांमधील चर्चा आहे. आम्ही ही जागा मागितली नव्हती. आम्हाला १३-१४ जागा हव्या होत्या. त्या हळूहळू १० वर आल्या. मी त्या चिंतेत होतो. ठीक आहे, हा निर्णय झाला तर त्यामागे ताकदीने उभं राहायचं. उद्धव ठाकरेंचा स्वभाव असा आहे एकदा त्यांचा निर्णय झाला की, ते ताकदीने त्यासाठी लढतात. सूर्य एक वेळ पश्चिमेला उगवेल मात्र ते निर्णय बदलत नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्रातला शिवसैनिक त्यांच्या मागे उभा राहतो. गंगेत कोरोनाच्या काळात प्रेतं वाहून गेली. मात्र महाराष्ट्राला या कठीण काळात तारण्याचे कार्य तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. शेतकऱ्यांना पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी दिली असं त्यांनी सांगितले. 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनेक जागांवर पाणी सोडलं. कारण आघाडी एकसंघ राहिली पाहिजे. मागे अमरावतीत आम्ही अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. त्या निवडून आल्या आल्या भाजपात गेल्या. तेव्हा मला कुठली दुर्बुद्धी झाली होती माहिती नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना निवडून देणे हे अधिक धोकादायक आहे. कधी कुठे जातील काही पत्ता नाही असं सांगत जयंत पाटील यांनी काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. 

...तर माझा शेवटचा नमस्कार राहील

स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल. लोक काय म्हणतात ते फार महत्त्वाचं नाही. आपली विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की, माझ्या पक्षात राहायचं असेल, माझ्याबरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांचा प्रचार केला पाहिजे. त्यांनी इकडे तिकडे दुसरं काही केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहील असं सांगत जयंत पाटलांनी पक्षातील नाराज पदाधिकारी, कार्यकर्त्यांना इशारा दिला.

दरम्यान, इतक्या वेळा भाकरी करपली तरी आचारी बदलण्याची एकाचीही हिंमत झाली नाही. तुमच्यावर महागाई लादणारा, बेकारीची कुऱ्हाड रोखणारा, आपल्या आया बहिणींची अब्रू गेली त्यावर चकारही न काढणारा जो मूळ मालक आहे तो बदलण्याची वेळ आली आहे असा घणाघात जयंत पाटील यांनी भाजपावर केला. 

Web Title: Sangli Lok Sabha Constituency - NCP Sharad Pawar group leader Jayant Patil praised Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.