वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 11:24 AM2024-05-03T11:24:00+5:302024-05-03T11:24:52+5:30
Sangli Loksabha Election - अनेक ठिकाणचे उमेदवार कमकुवत पण आम्ही ते सांगत नाही, कारण आम्ही वाघ, त्यांना सोबत घेऊन विजयी करू असा दावा करत संजय राऊतांनी मित्रपक्षाला टोला लगावला.
सांगली - Sanjay Raut on Vishwajeet Kadam ( Marathi News ) वाघ हा समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही. सांगलीतला वाघ कोण हे ४ जूनला निकालानंतर कळेल असा खोचक टोला उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे वाघ असले तरी आम्ही सांगलीतील वाघ आहोत असं विधान कदम यांनी केले होते. त्यावर राऊतांनी हे भाष्य केले.
संजय राऊत म्हणाले की, सांगलीत वसंतदादा पाटील हा वाघ आम्ही पाहिलेला आहे. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे आम्ही पाहिलेत, वाघाची रचना आणि वाघाचा स्वभाव वेगळा असतो. विश्वजित कदम नक्कीच वाघ असतील पण ते वाघ आहेत की नाही हे ४ जूनला कळेल. जर त्यांनी मोठ्या ताकदीने चंद्रहार पाटलांना विजयी केले तर ते नक्कीच वाघ आहेत अशी पदवी आम्ही त्यांना देऊ. मविआच्या इथल्या प्रमुख नेत्यांना स्वत:ला वाघ असल्याचं सिद्ध करायचं असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांना विजयी केले पाहिजे मग आम्ही ४ जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू असं त्यांनी सांगितले.
तसेच वाघ आहोत हे सिद्ध करावे लागेल. शिवसेना अधिकृतपणे वाघ आहे. आमचे बोधचिन्ह वाघ हे बाळासाहेब ठाकरेंनी साकारलं आहे. वाघ हा समोरून हल्ला करतो. वाघ उत्तम शिकारी असून तो समोरून हल्ला करतो. झुडपात बसून वाघ कारस्थाने करत नाही. त्यामुळे सांगलीत कोण किती वाघ हे कळेल, सांगलीतील जनता वाघासारखी आहे. ती कुठलीही कारस्थाने, डावपेच सहन न करता पैलवान चंद्रहार पाटील यांच्या मागे उभी राहील असंही संजय राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, चंद्रहार पाटील कुठेही कमी पडत नाही. त्यांचे साखर कारखाने नाहीत, त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले नाहीत. संस्था बुडवल्या नाहीत. हा त्यांचा कमकुवतपणा नाही. ही त्यांची ताकद आहे. ते प्रामाणिक आहेत. असे अनेक उमेदवार मित्रपक्षाने उभे केलेत, ते कमकुवत असले तरी आम्ही त्यांचा प्रचार करतोय. हे आम्ही सांगत नाही. आम्हाला माहितीये आम्ही वाघ आहोत. आम्ही त्यांना विजयी करू हे खात्रीने सांगतो असं सांगत संजय राऊतांनी मित्रपक्षांनाही चिमटा काढला.