विशाल पाटील यांचे अमित शाहांना प्रत्युत्तर, म्हणाले, “शरद पवार-ठाकरेंना टार्गेट केले तर...”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 10:25 AM2024-07-22T10:25:32+5:302024-07-22T10:26:45+5:30
MP Vishal Patil Replied Amit Shah: भाजपाने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करायचे ठरवलेले दिसते आहे, असे सांगत विशाल पाटील यांनी टीका केली.
MP Vishal Patil Replied Amit Shah: महागाई, बेरोजगारी हे देशापुढील प्रमुख मुद्दे आहेत. मराठा समाजाला आरक्षण हे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मिळाले. शरद पवारांकडे सगळेच समाज आशेने पाहतात. भाजपाने शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना टार्गेट करायचे ठरवलेले दिसते आहे, या शब्दांत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले.
अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आरक्षणासह अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. अमित शाह यांनी केलेल्या टीकेवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पलटवार करण्यात येत आहे. पत्रकारांशी बोलताना खासदार विशाल पाटील यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार, उद्धव ठाकरेंना टार्गेट केले तर...
सांगू इच्छितो की शरद पवार, उद्धव ठाकरेंना टार्गेट केले तरीही त्यांची सहानुभूती वाढत जाणार आहे. अमित शाह यांनी पुण्यात राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोलायला हवे होते. परंतु, तसे काही बोलले नाही. हिंदू-मुस्लिम मुद्दा बनवून राज्यात लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला मात्र तो चालला नाही, अशी टीका विशाल पाटील यांनी केली. तसेच २०२४ चा अर्थसंकल्प मांडला जाईल. किमान हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांकडे पाहून मांडला जाईल, अशी अपेक्षा आम्हाला सगळ्यांनाच आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर मला बोलायचे होते पण ती संधी मिळाली नाही, असे विशाल पाटील म्हणाले.
राज्यात औरंगजेब फॅन क्लब म्हणजे महाविकास आघाडी
राज्यात औरंगजेब फॅन क्लब म्हणजे कोण तर ते म्हणजे महाविकास आघाडी. या औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत उद्धव ठाकरे आहेत. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केले. कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले. याकुब मेमनला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर ठाकरे बसले आहेत. झाकीर नाईक यांना शांततादूत बनवणाऱ्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले आहेत. PFI या संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांचा मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत, या शब्दांत अमित शाह यांनी हल्लाबोल केला होता.