सांगली : बंगला फोडून 15 तोळे दागिने,लाखोच्या रोकडवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 07:52 PM2017-08-13T19:52:06+5:302017-08-13T19:52:33+5:30
हरिपूर (ता. मिरज) येथील अशोक दत्तात्रय जोशी यांचा ‘पारिजात’ हा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने, एक लाखाची रोकड असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला.
सांगली, दि. 13 - हरिपूर (ता. मिरज) येथील अशोक दत्तात्रय जोशी यांचा ‘पारिजात’ हा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने, एक लाखाची रोकड असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. रविवारी पहाटे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
हरिपूरमध्ये विनायकनगरमधील लक्ष्मी कॉलनीत अशोक जोशी यांचा बंगला आहे. चार दिवसापूर्वी ते कुटूंबासह मुंबईला गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्या उत्तरेकडील बाजूच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाटाचा लॉक तोडला. त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील सोन्याच्या चार जोड बांगल्या, तीन जोड मंगळसूत्र, चार जोड रिंगा, पाच अंगठ्या असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. जोशी कुटूंब रविवारी पहाटे मुंबईहून घरी परतले. घरात गेल्यानंतर त्यांना बेडरुमधील विस्कटलेले साहित्य पाहून चोरी झाल्याचा संशय आला. तसेच लॉकरमध्ये दागिने व रोकडही नव्हती. बंगल्याभोवती संरक्षक भिंत आहे. या भिंतीवरुन उड्या मारुन चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केल्याची शक्यता आहे.
ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. महत्वाचे ठसे मिळाले आहेत. श्वान बंगल्यापासून काही अंतरावर गेले. तिथेच ते घुटमळले. दुपारी अशोक जोशी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन चोरी केल्याचा संशय आहे.
दुसरी घरफोडी-
महिन्यापूर्वी हरिपूरच्या विनायकनगर परिसरात चोरट्यांनी अलिशान बंगला फोडून २० तोळे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, देवांच्या मूर्ती व रोकड असा २१ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा अजूनही छड लागलेला नाही. तोपर्यंत चोरट्यांनी आणखी एक बंगला फोडून पोलिसांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे.