सांगली - उटगीतील आत्महत्या व्यसनाला कंटाळून, मराठा आरक्षणाचा केवळ उल्लेख
By admin | Published: September 23, 2016 09:34 PM2016-09-23T21:34:43+5:302016-09-23T21:34:43+5:30
उटगी (ता. जत) येथील बाळासाहेब लक्ष्मण चव्हाण (वय ४०) यांनी दारूच्या व्यसनाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे, असा दावा जिल्हा पोलिसप्रमुख
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 23 - उटगी (ता. जत) येथील बाळासाहेब लक्ष्मण चव्हाण (वय ४०) यांनी दारूच्या व्यसनाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे, असा दावा जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री पत्रकार परिषदेत केला. आत्महत्येची चौकशी करण्यासाठी तीन पथके नियुक्त केली आहेत. पथकाने शुक्रवारी दिवसभर उटगीत चौकशी सुरु ठेवली आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; नाही तर साक्षर मरतील’, असा उल्लेख चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
जत-वळसंग रस्त्यावरील केंचराया मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये चव्हाण यांनी बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली होती. या चिठ्ठीत नेमका काय उल्लेख आहे, याची माहिती सांगण्यासाठी पोलिसप्रमुख शिंदे यांनी शुक्रवारी रात्री पत्रकार परिषद बोलाविली होती.
शिंदे म्हणाले की, चिठ्ठीत सिद्धू महादेव पवार, राघवेंद्र पोतदार, सरस्वती पोतदार, रामचंद्र बाबर, त्यांची पत्नी लक्ष्मी बाबर, मुलगा राघवेंद्र ऊर्फ संतोष बाबर, या सहाजणांचा उल्लेख आहे. या सर्वांना माझ्या मृत्यूस जबाबदार धरावे, असे लिहिले आहे. यातील सिद्धू पवार चव्हाणचे सख्खे चुलत सासरे, तर रामचंद्र बाबर पत्नीचे सख्खे मावस मामा आहेत. सर्वजण चव्हाण यांच्या घराजवळच राहतात. चव्हाण यांना दारूचे व्यसन होते. गेल्या काही महिन्यात ते या व्यसनाच्या प्रचंड आहारी गेले होते. दारू पिऊन ते दररोज पत्नीला मारहाण करायचे.
शिंदे म्हणाले की, चव्हाण यांनी १२ सप्टेंबरला पत्नीला काठीने बेदम मारहाण केली होती. यात तिच्या डाव्या हाताचे हाड मोडले होते. चिठ्ठीत नावे लिहिलेले नातेवाईक चव्हाण यांना, ‘पत्नीला मारहाण करत जाऊ नकोस, दारूचे व्यसन सोड’, असे सांगत. यातून त्यांच्यात वादही झाला होता. पण चव्हाण यांच्या वर्तणुकीत काहीच फरक पडला नाही. पोलिसांनी चिठ्ठीतील उल्लेख असलेल्या सर्व नातेवाईकांची चौकशी केली. सरपंचांसह गावातील प्रतिष्ठित लोकांकडेही चौकशी केली. सर्वांनीच, चव्हाण यांना दारूचे व्यसन होते, दारू पिऊन ते पत्नीला मारहाण करत, असे सांगितले आहे. यावरून चव्हाण यांनी व्यसन व घरातील भांडणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही प्राथमिक माहिती आहे. पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे.
चिठ्ठीतील मजकूर असा...
शिंदे यांनी चिठ्ठीतील मजकूर वाचून दाखविला. यात चव्हाण यांनी लिहिले आहे की, ‘माझा पत्नी वैशालीशी विवाह झाल्यानंतर आम्ही सुखाने संसार केला. आम्हाला दोन मुलेही झाली. सख्खा चुलत सासरा सिद्धू पवार मला दारू पाजतो. तो आमच्या पती-पत्नीत भांडण लावतो. पत्नीला मारहाण कर, असे सांगतो. मी मेल्यानंतर वैशाली तू सुखी राहा, मुलांचा सांभाळ कर. चिठ्ठीत नावे लिहिलेल्या नातेवाईकांची चौकशी करून त्यांना मृत्यूस जबाबदार धरावे. सिद्धू पवार हा आमच्यावर करणीही करीत आहे. गावातील दिलीप चव्हाण हा माझा माणूस आहे. कृष्णा पवार यांचा सांभाळ करा. मराठ्यांना आरक्षण दिले नाही, तर साक्षर मरतील. जय श्रीराम.’
दारूची बाटली
शिंदे म्हणाले की, केंचराया मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये चव्हाण यांनी आत्महत्या केली. याठिकाणी दारूची अर्धी बाटली सापडली आहे. कदाचित चव्हाण यांनी दारूच्या नशेत ही चिठ्ठी लिहिली असण्याची शक्यता आहे. सिद्धू पवार यांच्या नावाचा चार ते पाचवेळा उल्लेख केला आहे, पण ते तर पत्नीला मारहाण करू नका, असे वारंवार सांगायचे. त्यांनी कधीही चव्हाण यांना दारू पाजली नाही. उलट दारूचे व्यसन सोड, असे ते सांगत.