सांगलीला पुन्हा अवकाळीचा तडाखा

By admin | Published: March 9, 2015 10:29 PM2015-03-09T22:29:10+5:302015-03-09T23:48:08+5:30

शेगावला गारपीट : मिरज, तासगावात रिमझिम; द्राक्षबागायतदार धास्तावले; रब्बी हंगामही हाताबाहेर

Sangli strikes again | सांगलीला पुन्हा अवकाळीचा तडाखा

सांगलीला पुन्हा अवकाळीचा तडाखा

Next

लिंगनूर/सोनी/मणेराजुरी/शेगाव : गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांचे कंबरडे मोडले असताना रविवारी पुन्हा मिरज पूर्व, तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. शेगाव परिसरात तर गारपीटही झाली. गेल्या आठवड्यातील पावसाने नुकसान व्हायचे ते झालेच, पण त्यातूनही अक्षरश: जिवाचे रान करून वाचविलेल्या फळबागा, तसेच रब्बी पिकांची सोमवारी रिमझिम पावसाने वाताहात केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात शिरढोण परिसरातही पाऊस पडला. तासगाव तालुक्यात सावर्डे, खुजगाव परिसरातही गारांचा पाऊस पडला.लिंगनूर/ सलगरे : मिरज पूर्व भागातील सीमावर्ती गावे चाबुकस्वारवाडी, शिरूर, पांडेगाव, अळट्टी, खटावचा सीमाभाग या परिसरात सायंकाळी सहापासून पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा शेतीपिके, रॅकवरील बेदाण्याचे नुकसान, कलिंगड, ज्वारी, गहू, कडबा, राशी केलेली धान्ये यांचे नुकसान संभवत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस आठवडाभरातच दुसऱ्यांदा झटका देऊ लागल्याने केवळ द्राक्षे व बेदाणा उत्पादकच नव्हे, तर सामान्य शेतकऱ्यालाही त्याचा मोठा फटका बसू लागला आहे.
मिरज पूर्व भागातील सीमावर्ती चाबुकस्वारवाडी, खटाव, शिरूर या परिसरात काल रात्रीही अत्यंत ढगाळ वातावरण झाले होते. काही ठिकाणी काल पावसाचा हलका शिडकावा झाला . यामुळे सीमाभागातील द्राक्षे, रॅकवरील बेदाणा, गहू, शाळू, कलिंगड या पिकांना फटका बसणार आहे. सोनी : ढगाळ पावसामुळे द्राक्ष बागायतदारांसह शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. अजून ३० ते ३५ टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.
शेगाव : जत तालुक्यातील शेगावमध्ये गारांचा पाऊस झाल्यानंतर आवंढी, बनाळी, लोहगाव, वायफळ, अंतराळ या भागातही हलक्या पावसाच्या सरी पडल्या. या भागात सध्या शेतीची कामे सुरू आहेत. मजुरांचा व यंत्रांचाही तुटवडा असल्याने ज्वारी, गहू, हरभरा शेतातच पडून आहे. या पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मणेराजुरी : मणेराजुरीसह परिसरास अवकाळी पावसाचा दुसऱ्यांदा तडाखा बसला आहे. द्राक्षबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरातील रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे. तासगाव पूर्व भागात आज सायंकाळी ६.३0 च्या सुमारास रिमझिम पावसाने सुरुवात केली. त्यामुळे शेतकरीवर्गाची धांदल उडाली. आठवड्यापूर्वी पावसाच्या तडाख्यानंतर लवकरात लवकर द्राक्षे काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू होती.


गारांचा पाऊस अन् धावपळ
उत्तर भागातील शेगाव येथे सायंकाळी साडेपाच वाजता गारपीट झाली. पंधरा मिनिटे गारा पडल्याने शेगाव परिसरातील ज्वारी, हरभरा, गहू, द्राक्ष, डाळिंब या पिकांचे नुकसान झाले आहे. शेगाव व उत्तर भागातील नाईक वस्तीपर्यंत गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

Web Title: Sangli strikes again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.