सांगली, तासगाव, कवठेमहांकाळ शोकसागरात

By Admin | Published: February 16, 2015 11:25 PM2015-02-16T23:25:09+5:302015-02-16T23:26:00+5:30

आबांच्या निधनाने राष्ट्रवादी सुन्न : तासगावात व्यवहार बंद, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, जिल्ह्यात सन्नाटा

Sangli, Tasgaon, Kavthehammakhal, in mourning day | सांगली, तासगाव, कवठेमहांकाळ शोकसागरात

सांगली, तासगाव, कवठेमहांकाळ शोकसागरात

googlenewsNext

सांगली/तासगाव/कवठेमहांकाळ : माजी उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव तथा आर. आर. पाटील यांच्या निधनाचे वृत्त सोमवारी सायंकाळी समजताच सांगली जिल्हा सुन्न झाला. सांगली शहरासह तासगाव, कवठेमहांकाळ, ढालगाव परिसरात शोककळा पसरली. तासगावातील मार्केट कमिटीमधील त्यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते धाय मोकलून रडत होते. शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून आबांना आदरांजली वाहण्यात आली. अंजनीतील त्यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. एकमेकांचे सांत्वन करताना कार्यकर्त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. कवठेमहांकाळमध्ये सन्नाटा पसरला होता.
आज दुपारी एकच्या सुमारास आबांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त जिल्ह्यात धडकले होते. तेव्हापासून सर्वच पक्षांतील कार्यकर्ते दूरध्वनीवरून एकमेकांशी संपर्क साधून विचारपूस करीत होते. अखेर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दूरचित्रवाहिन्यांवरून त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच अनेकांनी आक्रोश केला.
सांगलीतील राष्ट्रवादी कार्यालयात सन्नाटा पसरला होता. सकाळपासून जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यात कार्यकर्ते मग्न होते. पण सायंकाळी आबांच्या निधनाचे वृत्त येताच राष्ट्रवादीत शोककळा पसरली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, सचिव मनोज भिसे राष्ट्रवादी कार्यालयात थांबून कार्यकर्त्यांचे सांत्वन करीत होते. राष्ट्रवादीने या आठवडाभरातील सर्वच कार्यक्रम रद्द केले.
तासगाव : आर. आर. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच तासगाव तालुक्यावर शोककळा पसरली. आर. आर. पाटील यांच्यावर दोन-तीन महिन्यांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे तालुक्यातले त्यांचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक सतत त्यांच्या तब्येतीची चौकशी करीत होते. अखेर आज त्यांनी शेवटचा श्वास घेतल्याचे कळताच, त्यांच्या कार्यकर्त्यांना दु:ख अनावर झाले. तासगावातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सुरूवातीपासून असलेल्या त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
बाजार समितीमधील कार्यालयापुढे येताच कार्यकर्त्यांना अश्रू अनावर होत होते. आबांच्या जाण्याने त्यांना जबरदस्त धक्का बसल्याचे चित्र होते. कार्यकर्त्यांचे हुंदके मन हेलावणारे होते. एकमेकांना आधार देत कार्यकर्ते सावरण्याचा प्रयत्न करत होते. तालुक्यात दुपारी ४.३० च्या दरम्यान आबांच्या निधनाचे वृत्त समजल्यापासून कार्यकर्ते सैरभैर झाले.
सकाळी १०-११ वाजल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याची चर्चा सुरू झाली, तशी आबांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरूवात केली होती. सकाळपासून कार्यकर्ते कार्यालयात बसून होते व मुंबईशी संपर्क ठेवून होते. क्षणा-क्षणाला त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होते. दुपारनंतर त्यांची प्रकृती गंभीर, परंतु स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर कार्यकर्त्यांना धीर आला होता. प्रकृती स्थिर असल्याचे समजताच काहीसे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर होते. मात्र कान मुंबईकडेच होते. अखेर नको असणारा क्षण आलाच. वृत्तवाहिन्यांवर त्यांच्या निधनाचे वृत्त येताच कार्यकर्ते बाजार समितीच्या दिशेने येत होते. तसेच तासगावातील दुकाने बंद झाली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आबांना आदरांजली अर्पण केली. एकंदरीत तासगाव शोकसागरात बुडाल्याचे चित्र होते. बाजार समितीमधील बेदाणा सौदे बंद करण्यात आले.
परिसर सुन्न-सुन्न झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दु:खाची छटा स्पष्ट दिसत होती. आबांच्या कारकीर्दीच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. एकमेकांच्या गळ्यात पडून ते रडत होते. (प्रतिनिधी)


व्यवहार बंद ठेवून आदरांजली
कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली असून, तालुक्यातील गावांमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कवठेमहांकाळ शहरात बातमी समजताच शहरात सर्वपक्षीय कार्यकर्ते जमा झाले. शहरातील शिवरात्र उत्सव रद्द करण्यात आला. त्यानिमित्ताने ठेवण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. विविध ठिकाणी लावण्यात आलेली डिजिटलही उतरवण्यात आली. लहान बालकांपासून अबाल-वृद्ध आबांच्या निधनाने शोक व्यक्त करीत होते.
मंगळवार, दि. १७ रोजी सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात येणार असून, शहरातील सर्व व्यवहार व आठवडा बाजार बंद राहणार आहेत.

Web Title: Sangli, Tasgaon, Kavthehammakhal, in mourning day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.