दिल्लीतील मराठा क्रांती मोर्चात घुमणार सांगलीचा आवाज

By admin | Published: October 5, 2016 09:56 PM2016-10-05T21:56:10+5:302016-10-05T21:56:10+5:30

विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे सुरू असताना, आता हा मोर्चा थेट देशाच्या राजधानीत दिल्लीत धडकणार आहे. दिल्लीतील मोर्चासाठी जिल्ह्यातील

Sangli voice revolves in Delhi's Maratha Kranti march | दिल्लीतील मराठा क्रांती मोर्चात घुमणार सांगलीचा आवाज

दिल्लीतील मराठा क्रांती मोर्चात घुमणार सांगलीचा आवाज

Next

- शरद जाधव/ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 05 - विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे सुरू असताना, आता हा मोर्चा थेट देशाच्या राजधानीत दिल्लीत धडकणार आहे. दिल्लीतील मोर्चासाठी जिल्ह्यातील गलाई बांधवांनी मोट बांधली असून, मोर्चाचे नियोजन, बैठका, शासकीय पातळीवर नेत्यांच्या भेटी यासाठी कंबर कसली आहे. या बांधवांच्या सहभागामुळे सांगलीचा आवाज दिल्लीत घुमणार आहे.
नैसर्गिक अवकृपा आणि त्यामुळे करावा लागणारा संघर्ष सोसत खानापूर, आटपाडी तालुक्याचे नाव देशात नव्हे तर जगभर पोहोचविण्यात गलाई बांधव यशस्वी झाले आहेत. देशातील असे एकही शहर नाही की तेथे येथील गलाई व्यावसायिक पोहोचलेला नाही. राज्यभर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे लोण देशपातळीवरही पोहोचले असून, या महिन्याच्या अखेरीला दिल्लीत मराठ्यांचा आवाज घुमणार आहे.
या मोर्चाचे जोरदार नियोजन चालू असून, या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ते जिल्ह्यातील गलाई बांधव. गलाई व्यवसायाच्या निमित्ताने दिल्ली परिसरात स्थायिक झालेल्या मराठा बांधवांची राज्यातील मराठा क्रांती मोर्चे पाहून घालमेल होत होती. इच्छा असूनही त्यात सहभागी होता येत नसल्याने समाजातील प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी दिल्लीतच मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त करत त्याचे नियोजन सुरू केले आहे. केवळ मराठा बांधवांपर्यंत न पोहोचता केंद्र सरकारमधील मंत्री, सर्व राजकीय पक्षात कार्यरत असणा-या मराठी नेत्यांच्या भेटी घेत वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. राज्यात सुरू असणा-या मराठा क्रांती मोर्चातील अपडेटही पोहोचविण्यात येत आहेत.
दिल्लीच्या मोर्चात गलाई बांधवांबरोबरच सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे शंभरांवर मराठी वकील, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणावर असणारे ‘रोड मराठा’ही सहभागी होणार आहेत.
शिवाय राज्यातूनही अनेक बांधव जाणार आहेत. इतिहासात दिल्लीच्या तख्ताला आव्हान देणा-या मराठा समाजाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी लाखाहून अधिक बांधवांचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार संयोजकांनी व्यक्त केला आहे.
उत्तर भारतातील गलाई बांधव
दिल्लीसह उत्तर भारतातील सर्व मराठा बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. लखनौ, कुरूक्षेत्र, पानिपत, कर्नाल, पंजाब, अमृतसर, जम्मू येथील मराठा बांधवांनी दिल्लीतील मोर्चात सहभागी होण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे दिल्लीतील मोर्चाही ऐतिहासिक ठरणार आहे.

दिल्लीतील मोर्चा यशस्वीतेसाठी कार्यरत गलाई बांधव...
विशाल साळुंखे (मेंगाणवाडी), प्रदीप पाटील (ढवळेश्वर), सतीश शिंदे (मंगरूळ), शहाजी आप्पा पाटील (कुर्ली), कृष्णकांत थोरात (पारे), विनोद देशमुख (विखळे) यांच्यासह सांगली, सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य गलाई बांधव.

मराठा समाजातील विविध मागण्यांसाठी राज्यात महाविराट मोर्चे काढले जात असताना, त्यात सहभागी होता येत नसल्याची खंत होती. मात्र, दिल्लीत स्थायिक झालेल्या सर्व मराठा बांधवांच्या पुढाकाराने दिल्लीतच मराठा क्रांती मोर्चा का काढण्याबाबत चर्चा झाली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चाचे नियोजन सुरू असून, दिल्लीतील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील.
- विशाल साळुंखे (मेंगाणवाडी), गलाई व्यावसायिक, आयोजक मराठा क्रांती मोर्चा, दिल्ली.

Web Title: Sangli voice revolves in Delhi's Maratha Kranti march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.