सांगलीत पाच लाखांचा ऐवज लंपास
By admin | Published: May 2, 2017 08:17 PM2017-05-02T20:17:25+5:302017-05-02T20:17:25+5:30
राजेंद्र गणपतराव गंगवाणी यांचा बंगला फोडून चोरट्यांनी १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने, दीड लाखाची रोकड असा पाच लाखाचा ऐवज लंपास केला
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 2 - येथील हसनी आश्रममधील राजेंद्र गणपतराव गंगवाणी यांचा बंगला फोडून चोरट्यांनी १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने, दीड लाखाची रोकड असा पाच लाखाचा ऐवज लंपास केला. ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद आहे.
गव्हर्नमेंट कॉलनीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर हसनी आश्रम आहे. तिथे गंगवाणी यांचा बंगला आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता गंगवाणी कुटूंब परगावी गेले होते. बंगल्याच्या पाठीमागील बाजूस देवघर आहे. त्याला खिडकीही आहे. पण परगावी जाताना हे कुटूंब खिडकीचा दरवाजा लावण्यास विसरुन गेले. याची संधी साधून चोरट्यांनी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाट फोडले. त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमध्ये १२ तोळे सोन्याचे दागिने व दीड लाखाची रोकड होती. हा सर्व ऐवज लंपास करुन चोरट्यांनी पलायन केले. ३० एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता गंगवाणी कुटूंब परगावाहून आले. बेडरुमधील साहित्य विस्कटलेले तसेच देवघरीच्या खिडकीचा गज कापल्याचे निदर्शनास येताच त्यांना चोरीचा झाल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांनी तातडीने भेट देऊन पाहणी करुन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले होते. मात्र श्वान बंगल्याच्या परिसरातच घुटमळले. ठसे तज्ञांना महत्वाचे ठसे मिळाले आहेत. रात्री उशिरा राजेंद्र गंगवाणी यांची फिर्याद घेण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हेगारानी पाळत ठेऊन चोरी केल्याचा संशय आहे. त्याद्दष्टिने तपासाची चक्रे फिरविली जात आहे.