वर्चस्ववादात अडकले सांगलीचे मंत्रीपद
By admin | Published: September 1, 2015 10:26 PM2015-09-01T22:26:22+5:302015-09-01T22:26:22+5:30
अनेकांच्या पदरी निराशा : घटकपक्षांच्या मंत्रीपदाला चंद्रकांतदादांचा अडसर?
सांगली : मंत्रीपदापासून अलिप्त राहिलेल्या सांगली जिल्ह्याची चर्चा राज्याच्या पटलावरही गाजत आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात भाजपचेच वर्चस्व राहावे, या हेतूने घटकपक्षांच्या नेत्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले जात आहे, अशी खंत घटकपक्षांच्याच एका नेत्याने (नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर) व्यक्त केली. दुसरीकडे दोन्ही जिल्ह्यातील आपले महत्त्व कमी होऊ नये, म्हणून चंद्रकांतदादांचा स्वकीयांच्या मंत्रीपदालाही विरोध वाढल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये घटकपक्षांची ताकद मोठी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या जिल्ह्यांंना घटकपक्षांच्या माध्यमातून मंत्रीपदे मिळाली, तर याठिकाणचे भाजपचे महत्त्व कमी होईल आणि भविष्यात त्यातून पक्षाला फटकाही बसू शकतो, असे गणित मांडले जात आहे. याच गणिताच्या आधारावर घटकपक्षांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा प्रश्न रेंगाळल्याचे सांगण्यात येत आहे. घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सांगली जिल्ह्याला वर्षानुवर्षे मंत्रीपदाची परंपरा आहे. एकाचवेळी चार-पाच मंत्रीपदे सांगलीने भूषविली आहेत. मुख्यमंत्रीपदापासून राज्यमंत्रीपदापर्यंत आणि महामंडळांच्या अध्यक्षपदापासून ते विविध राज्यस्तरीय समित्यांच्या अध्यक्षपदापर्यंत अनेक पदे सांगली जिल्ह्याच्या वाट्याला आली. या परंपरेला भाजप सरकारच्या कालावधितच खंड पडला.
सांगलीला मंत्रीपदच नसल्याने कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सांगलीचेही पालकत्व सोपविण्यात आले आहे. वास्तविक दोन्ही जिल्ह्यांची सूत्रे त्यांच्याकडे असल्यामुळे जिल्ह्याला पूर्ण न्याय देणे त्यांना शक्य होत नसल्याचे दिसत आहे. प्रत्येक महिन्याला किंवा आठवड्याला येणेही शक्य नसल्याने जिल्ह्याच्या आढावा बैठकांचा आलेखही घटला आहे. त्यामुळे जिल्ह्याला मंत्रीपद मिळावे म्हणून राजकीय ताकद लावली जात आहे. जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांची नावे यापूर्वी चर्चेत होती. खाडे यांना पक्षीय पद देऊन शांत केले आहे. आता उर्वरित नेत्यांमध्ये मंत्रीपदाची शर्यत असली तरी, घटकपक्षांच्या एका नेत्याने सांगलीला मंत्रीपद न मिळण्याची कारणे सांगितली. चंद्रकांतदादांना दोन्ही जिल्ह्यातील ताकद अबाधित ठेवायची असल्याने, ते जिल्ह्याच्या स्वतंत्र मंत्रीपदासाठी फारसे उत्सुक नसल्याचे घटकपक्षांच्याच एका नेत्याने सांगितले.
दुसरीकडे घटकपक्षांना मंत्रीपद दिल्यास सांगली जिल्ह्याच्या वाट्याला एखादे मंत्रीपद येऊ शकते. सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही मंत्रीपदे दिली जाऊ शकतात. घटकपक्षांची ताकद या चार जिल्ह्यांमध्ये अधिक असल्याने याठिकाणी भाजपला अन्य पक्षांना वरचढ होऊ द्यायचे नाही. (प्रतिनिधी)
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निराशा
मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेकदा घोषणा झाल्या. प्रत्येक घोषणेवेळी सांगलीतील नेत्यांच्या आशा वाढवून ठेवण्यात आल्या. मात्र प्रत्येकवेळी त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे कोणत्याही नेत्याच्या घोषणांवर स्थानिक नेते व पदाधिकारी आता विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. पक्षीय शिष्टाचार म्हणून ते गप्प असले तरी, त्यांची खदखद कायम आहे.
भाजपमध्ये अन्य पक्षांतून आलेले नेते आणि निष्ठावंत पदाधिकारी यांना आजवर महामंडळाचे गाजर भाजपने दाखविले. प्रत्यक्षात एकाही व्यक्तीची निवड महामंडळे किंवा कोणत्याही राज्यस्तरीय समितीवर होऊ शकली नाही. मंत्रीपदापासून वंचित असलेला हा जिल्हा अन्य पदांपासूनही तितकाच दूर आहे. निष्ठावंत आणि बाहेरून आलेल्या नेत्यांमध्येही यामुळे निराशा पसरली आहे.