सांगलीची लक्तरे दिल्लीच्या वेशीवर

By admin | Published: April 29, 2015 11:37 PM2015-04-29T23:37:34+5:302015-04-30T00:25:55+5:30

प्रदूषणाचा कहर : दमा आणि सीओपीडी रुग्णांमध्ये सात टक्क्यांनी वाढ--लोकमत विशेष

Sangli's rivalry on the Delhi gates | सांगलीची लक्तरे दिल्लीच्या वेशीवर

सांगलीची लक्तरे दिल्लीच्या वेशीवर

Next

नरेंद्र रानडे - सांगली
घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा, ई-कचऱ्याची समस्या, औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाकडे दुर्लक्ष आदी प्रमुख कारणांमुळे शहरातील प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालात वायू प्रदूषणाचा स्तर वाढलेल्या शहरांमध्ये सांगलीचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी सांगलीच्या घनकचरा, नदी प्रदूषणाचा प्रश्नही दिल्लीपर्यंत गाजला. सांगलीच्या प्रदूषणाची लक्तरे दिल्लीच्या वेशीवर टांगली गेली तरी, त्याचे गांभीर्य प्रशासकीय पातळीवर दिसत नाही.
महापालिका क्षेत्रात दररोज सुमारे ११० टन कचरा जमा होतो. सांगली जिल्हा सुधार समितीच्या सर्वेक्षणानुसार वीस टन कचरा हा प्लॅस्टिकमिश्रित असतो. वास्तविक या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यानुसार विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. ओला, सुका तसेच प्लॅस्टिकमिश्रित कचरा एकत्रितरित्याच गोळा करण्यात येत आहे. काहीवेळा उपनगरांमधील कचरा कोंडाळ्यातच पेटविण्यात आल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे. ई-कचऱ्याचा प्रश्नदेखील गंभीर आहे.
वाढत्या वायुप्रदूषणाने मागील काही महिन्यांपासून दमा आणि सीओपीडी (क्रॉनिक आॅपस्ट्रक्टीव्ह पलमोगरी डिसीज) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.


प्रदूषणाचा अहवाल गायब
महाराष्ट्र महापालिका, नगरपालिका अधिनियम १९९४ च्या कलम ६७ नुसार दरवर्षी वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणाचा अहवाल तयार करून तो महासभेत मांडायचा असतो. तत्कालीन आयुक्त मिलिंद म्हैसकर यांच्या कालावधित २००४-०५ चा प्रदूषण अहवाल तयार करण्यात आला होता. त्यानंतर दहा वर्षे महापालिकेने हा अहवालच सादर केला नाही.



आरोग्य धोक्यात
सीओपीडी आजारात फुफुसाची कार्यक्षमता कमी होते. परिणामी रुग्णांमध्ये दम लागणे, सतत खोकला येणे, छातीतून घरघरणे आदी लक्षणे दिसून येतात. सध्या वाढत्या वायू प्रदूषणामुळे प्रामुख्याने ३५ ते ४० वयोगटातील रुग्णांमध्ये याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.


कमाल मर्यादा ओलांडल्या
महापालिकेच्या २००४-०५ च्या अहवालात ध्वनी, वायू आणि जलप्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले होते. शहरातील नागरी, औद्योगिक भागात तरंगणारे घटक, सल्फरडाय आॅक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड यांचे प्रमाण कमाल मर्यादेपेक्षा दुप्पट झाले होते. गेल्या दहा वर्षांत यात मोठी भर पडली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळही याबाबत गाफील आहे.

वाढत्या प्रदूषणाला आळा घालणे हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्य आहे. परंतु हे मंडळ केवळ नोटीसबहाद्दर म्हणूनच ओळखले जाते. मंडळ कार्यशील आहे, हे जनतेला दाखविण्यासाठी ‘कारवाई’ला नव्हे, तर संबंधितांना नोटीस पाठविण्यालाच प्राधान्य देण्यात येत आहे.
- अ‍ॅड. अमित शिंदे, अध्यक्ष,
सांगली जिल्हा सुधार समिती.


वाढत्या वायुप्रदूषणामुळे तरुण वयातच सीओपीडी आणि दमा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांनी तातडीने उपचार घेणे आवश्यक असून या आजारांपासून दूर राहण्यासाठी नियमित प्राणायम आणि शहरात फिरताना पूर्ण बंद असलेले हेल्मेट अथवा मास्क वापरणे आवश्यक आहे.
- डॉ. अनिल मडके,
छातीरोगतज्ज्ञ, सांगली.


नागरिकांना स्वच्छ हवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाने नियमानुसार प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. तसे होताना दिसत नसल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण कार्यालयाविरुध्द कारवाई होण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- डॉ. ज्ञानचंद्र पाटील, अध्यक्ष,
ग्राहक पंचायत सांगली.


राज्यातील प्रदूषित अठरा शहरांमध्ये सांगलीचा समावेश असल्याचे समजले. परंतु संबंधितांनी यासाठी कोणता आधार घेतला आहे, हे समजू शकले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ आपले कार्य करीत असून नागरिकांनीही वायुप्रदूषण होऊ नये यासाठी जागरुक राहणे गरजेचे आहे.
- जयवंत हजारे,
उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली.

Web Title: Sangli's rivalry on the Delhi gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.