सांगलीत तरुणावर खुनीहल्ला हत्यार सापडले; जखमी गायब; हल्लेखोरही पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 10:53 PM2017-08-13T22:53:56+5:302017-08-13T22:54:00+5:30
आपटा पोलिस चौकीजवळ एका तरुणावर खुनीहल्ला करण्यात आला. यामध्ये हा तरुण जखमी झाल्याने त्याने स्वत:च्या बचावासाठी तेथून पलायन केले.
सांगली : येथील आपटा पोलिस चौकीजवळ एका तरुणावर खुनीहल्ला करण्यात आला. यामध्ये हा तरुण जखमी झाल्याने त्याने स्वत:च्या बचावासाठी तेथून पलायन केले. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. हल्ला करण्यासाठी वापरलेले हत्यार सापडले; पण रात्री उशिरापर्यंत जखमीचा तसेच हल्लेखोरांचा शोध लागला नव्हता.
माळी कामासाठी वापरण्यात येणाºया मोठ्या कात्रीने तिघांच्या टोळीने तरुणावर हल्ला केला. त्याच्या चेहºयावर वार बसल्याने तो रक्तबंबाळ झाला. बचावासाठी त्याने तेथून काळी खणीजवळ असलेल्या खोक्यांकडे पलायन केले. नागरिकांनी गर्दी झाल्याने हल्लेखोर आपटा पोलिस चौकीजवळील मिनी बसमागे लपून बसले. जखमी तेथून कर्मवीर चौकाकडे गेला. नागरिकांनी विश्रामबाग पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस तातडीने दाखल झाले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. घटनास्थळी हल्ला करण्यासाठी वापरलेली कात्री पडली होती. ती जप्त करण्यात आली आहे. जखमीचा पोलिसांनी कर्मवीर चौक परिसरात शोध घेतला. पण तो सापडला नाही. शासकीय रुग्णालयातही चौकशी करण्यात आली. मात्र तिथेही तो उपचारासाठी दाखल झाला नव्हता. खासगी रुग्णालयातूही तो उपचारार्थ दाखल असल्याची नोंद पोलिसांकडे आली नाही. त्यामुळे जखमीचे नाव? हल्ला कोणी केला व कशासाठी केला? याचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही.