किशोरवयीन विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन अस्मिता योजना : शनिवारपर्यंत नोंदणीचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 09:01 PM2018-02-09T21:01:01+5:302018-02-09T21:01:21+5:30
किशोरवयीन विद्यार्थिनींसह ग्रामीण भागातील महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
अमरावती : किशोरवयीन विद्यार्थिनींसह ग्रामीण भागातील महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीवजागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात अस्मिता योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वर्षे या वयोगटातील मुलींची माहिती उपलब्ध करण्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.
योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅपवर मागणी नोंदविणे आवश्यक आहे. याकरिता या मुलींची माहिती मागविण्यात आली आहे. सदर माहिती ‘आपले सेवा’ केंद्रामार्फत अॅपमध्ये भरावयाची आहे. ही बाब विचारात घेऊन आपापल्या जिल्ह्यातील जि.प. शाळांमधील ११ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींची माहिती मुख्याध्यापकांकडून घ्यावी व ती माहिती ‘आपले सेवा’ केंद्रचालकांकडे उपलब्ध करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिका-यांना निर्देश द्यावेत, अशी सूचना शासनाचे अवर सचिव अनिल काळे यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले आहेत.
अंमलबजावणी अनिवार्य -
योजनेची अंमलबजावणी विहित कालावधीत सुरू करावयाची असल्याने सीईओंनी व्यक्तिश: लक्ष घालून किशोरवयीन मुलींची माहिती १० फेब्रुवारीपर्यंत संकलित करावी व ती ‘आपले सेवा’ केंद्राच्या चालकांकडे उपलब्ध होईल, याबाबत कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.