‘सॅनिटरी नॅपकिनचा समावेश अत्यावश्यक यादीत करा’
By admin | Published: June 30, 2017 03:09 AM2017-06-30T03:09:31+5:302017-06-30T03:09:31+5:30
भारतीय बनावटीच्या व भारतीय उत्पादकांनी तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकिन जीएसटीमुक्त कराव्यात; तसेच सॅनिटरी नॅपकिनचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत करावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय बनावटीच्या व भारतीय उत्पादकांनी तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकिन जीएसटीमुक्त कराव्यात; तसेच सॅनिटरी नॅपकिनचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत करावा, अशी मागणी मनसेने केली आहे. शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने गुरुवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन ही मागणी केली.
एकीकडे देशात सॅनिटरी नॅपकिनचा वापर वाढावा यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता असताना सरकार त्यावर जीएसटीसारखे कर लावत आहे. भारतीय समाजात अजूनही मासिक पाळीबाबत नकारात्मक भावना आहे. शहरी तसेच ग्रामीण
भागातील अधिकाधिक महिलांनी सॅनिटरी नॅपकिन वापरणे अत्यावश्यक आहे.
त्याचा वापर वाढवायचा असेल तर त्याच्या किमती कमीतकमी ठेवणे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिनचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत करावा, अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी केली.
अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना निवेदन देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती ठाकरे यांनी या भेटीनंतर दिली.