शाळा, शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन
By admin | Published: June 3, 2016 03:14 AM2016-06-03T03:14:54+5:302016-06-03T03:14:54+5:30
पालिका शाळा व सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन लावण्याचा निर्धार शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी केला होता़ भाजपाने मात्र ही मशीन लवकरच शाळा
मुंबई : पालिका शाळा व सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन लावण्याचा निर्धार शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी केला होता़ भाजपाने मात्र ही मशीन लवकरच शाळा, प्रसूतिगृह व सार्वजनिक शौचालयांमध्ये बसविण्यात येणार असल्याची गुरुवारी घोषणा करीत याचे श्रेय आपल्या खात्यावर जमा केले़
पालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मित्रपक्षामध्ये चढाओढ सुरू आहे़ २०१४ मध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी पालिका शाळेत, गलिच्छ वस्तींमधील महिलांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्याची घोषणा केली होती़ मात्र भाजपाने आता हा प्रकल्प
हायजॅक केला आहे़ या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त आय़ए़ कुंदन यांनी दिले असल्याचा दावा भाजपाने केला आहे़
गरीब व मध्यमवर्गीय महिलांना विविध कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकीन आर्थिकदृष्ट्याही परवडत नाहीत़ तसेच विल्हेवाट लावण्याची सोय नसल्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकीन शौचालयांमध्येच टाकण्यात येतात़ यामुळे मलनिस्सारण वाहिनी तुंबते़ म्हणून ही स्वयंचलित मशीन इन्सिनेटरच्या सुविधेसह असेल, अशी माहिती महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांनी आज दिली़ शिरवाडकर भाजपाच्या नगरसेविका आहेत़ (प्रतिनिधी)