स्वच्छतागृहातच अस्वच्छता
By admin | Published: July 19, 2016 01:00 AM2016-07-19T01:00:08+5:302016-07-19T01:00:08+5:30
स्वच्छतागृहाच्या देखभालीकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांची, विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे.
कोथरूड : पौडर स्त्यावरील वनाझ कंपनीजवळ असलेल्या स्वच्छतागृहाच्या देखभालीकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांची, विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे.
मुंबई, कोकण, मुळशी-मावळ भागाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी उभारलेल्या एसटी व खासगी प्रवासी बसथांब्यानजीक महापालिकेचे स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहामुळे प्रवाशांबरोबरच लोकमान्य झोपडपट्टीमधील महिलांचीही सोय झाली होती; परंतु गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ महिला स्वच्छतागृहाची वीज बंद
आहे.
स्वच्छतागृहात नळ नसल्याने मोठी अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली आहे. दारूच्या बाटल्या व तत्सम कचरा स्वच्छतागृहात पडलेला आहे. मुख्य रस्त्यावर असूनही या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडे व देखभालीकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करण्यास धजावतातच कसे, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अविनाश दंडवते यांनी उपस्थित केला. दंडवते म्हणाले, ‘‘येथील बसथांबा नोकरदार व प्रवाशांनी नेहमीच गजबजलेला असतो. स्वच्छ स्वच्छतागृह उपलब्ध करुन देणे, हे महापालिकेचे कर्तव्य आणि नागरिकांचा अधिकार आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून महापालिकेने नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवले आहे.’’ (वार्ताहर)
स्मार्ट पुणे करायला निघालेल्या आयुक्तांनी एकदा या स्वच्छतागृहालाही भेट द्यावी. आम्हाला दुय्यम वागणूक देण्याचाच हा प्रकार आहे. विजेची सुविधा नाही, नळ नाही, अस्वच्छता यांमुळे आमची कुचंबणा होत आहे. व्हेंटिलेशनची सोय नसल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
- श्रावणी शिंदे, प्रवासी