संजय बारू यांचा पंतप्रधानांवर आरोप
By admin | Published: May 9, 2014 01:40 AM2014-05-09T01:40:57+5:302014-05-09T01:40:57+5:30
पंतप्रधान स्वत: कधीही श्रेय घेत नसत हा वेगळा भाग. पण ते त्यांना दिलेही जात नसे, असा आरोप पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारु यांनी पुन्हा एकदा केला आहे.
मुंबई : पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोणतेही निर्णय घेऊ दिले गेले नाहीत. प्रत्येक वेळी त्यांना श्रेष्ठींपुढे नमते घ्यावे लागत होते. त्यांनी चांगले निर्णय घेतले तरी त्याचे श्रेय काँग्रेस पक्ष व नेते घेत. पंतप्रधान स्वत: कधीही श्रेय घेत नसत हा वेगळा भाग. पण ते त्यांना दिलेही जात नसे, असा आरोप पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारु यांनी पुन्हा एकदा केला आहे. मुंबईतील क्रॉसवड बूकस्टोरमध्ये त्यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकाचे प्रकाशन बारू यांच्याच हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बारु यांनी अनिवासी भारतीय उद्योगपती लक्ष्मीपती मित्तल यांचे उदाहरण दिले. २००७ साली मित्तल हे आर्सेलर ही फ्रेंच कंपनी घेऊ इच्छित होते. त्यावेळी मनमोहनसिंग यांनी एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली होती. २००८ साली झालेल्या भारत-अमेरिका अणुकराराच्या दरम्यान काँग्रेस वेळकाढूपणा करीत होते. त्यामुळे या कराराला उशीर होत होता व पंतप्रधानांची यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर नामुष्की होण्याची वेळी आली होती. मात्र, सिंग यांनी सोनियांना अणुकरार मार्गी लावणार नसाल तर पंतप्रधानपदी नवीन व्यक्तीचा शोध घ्या, असे स्पष्ट शब्दांत बजावले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी केलेल्या धाडसामुळे अमेरिकेसोबत अणुकरार झाला होता. मात्र त्याचे पुरेसे श्रेय त्यांना दिले गेले नाही, असेही बारू यांनी सांगितले. भारताला दमदार नेतृत्त्वाची गरज असल्याचे सांगून बारू पुढे म्हणाले की, एखाद्या सरकारमध्ये इतरांचा हस्तक्षेप होत असेल तर ते सरकार मृत असल्यासारखेच असते. ज्योती बसू मुख्यमंत्री होते, त्या काळात ते पक्षाचे नेते प्रणव दासगुप्ता यांना रिपोर्ट करायचे. तसेच मनोहर जोशी जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांना बाळासाहेब ठाकरेंना रिपोर्ट करावे लागत असे. देशाला खंबीर सरकार व नेत्याची गरज असते, असे सांगून सरकारमधील इतर घटकांचा हस्तक्षेप चुकीचाच असल्याचे बारु पुढे म्हणाले. मंत्रिमंडळाने गुन्हेगार नेत्यांबाबत काढलेला अध्यादेश फाडून टाकण्यायोग्य असल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर पंतप्रधानांनी लगेच राजीनामा द्यावा, असे मत मी जाहीरपणे व्यक्त केले होते. पंतप्रधान कन्येने आपल्याला एसएमएस पाठवून याच्याशी सहमती दर्श विली होती, असेही बारू यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांनी केली गद्दारी!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानांशी २००९ मध्ये गद्दारी केली होती, असा आरोपही यावेळी बारू यांनी केला. ज्या पृथ्वीराज चव्हाण यांना पंतप्रधानांमुळे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्रिपद मिळाले होते, त्यांनी याचे श्रेय पंतप्रधानांऐवजी राहुल गांधींना दिले होते. २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या यशाचे श्रेयही पंतप्रधानांना देण्यात आले नाही.